बैलांच्या झुंजीचा समारोप विहिरीत
By admin | Published: April 7, 2017 11:20 PM2017-04-07T23:20:44+5:302017-04-07T23:20:57+5:30
ममदापुर : बैलांमध्ये झुंज होऊन दोन्हीही बैल दीड ते दोन फूट पाणी व ३५ फूट खोल असलेल्या विहिरीत पडल्याने जखमी झाल्याची घटना येथे घडली.
ममदापुर : पाणी पाजण्यासाठी विहिरीवर नेलेल्या बैलांमध्ये झुंज होऊन दोन्हीही बैल दीड ते दोन फूट पाणी व ३५ फूट खोल असलेल्या विहिरीत पडल्याने जबर जखमी झाल्याची घटना येथे घडली.
ममदापूर (ता. येवला) येथे श्रावण शिंदे या शेतकऱ्याने आपल्या मालकीची बैलजोडी पाणी पाजण्यासाठी शेजारच्या नारायण शिंदे यांच्या विहिरीवर नेली असता तेथे दोन्ही बैलांमध्ये झुंज झाली. शिंदे यांनी ही झुंज सोडवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु झुंज काही केल्या सुटेना. शेजारी असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने दोन्ही बैल तीस ते पस्तीस फूट खोल विहिरीत पडले. यावेळी विहिरीत साधारण एक ते दीड फूटच पाणी असल्याने बैलांना जबर मार लागला. त्यातील एक बैल अतिगंभीर जखमी झाला.
ही घटना शेजारी असलेले शेतकरी शिवाजी सदगीर, नारायण शिंदे यांनी विहिरीत उतरून बैलांना दोराने बांधले व वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी दोराच्या साहाय्याने या बैलांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी हिरामण सदगीर, भाऊलाल सदगीर, भीमराव वाघ, किरण वैद्य, ज्ञानेश्वर केरे, साईनाथ शिंदे, नवनाथ सदगीर, बिटू बेडके यांच्यासह शेतकऱ्यांनी याकामी मदत केली. यातील एका बैलाच्या पाठीचा कणा मोडल्याने त्याला उभेदेखील राहाता येत नाही. शिंदे यांचा पंचवीस ते तीस हजार रु पये किमतीचा एक बैल यामुळे निकामी झाला आहे. (वार्ताहर)