उभ्या पिकात सोडले बैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:38 PM2018-08-11T17:38:39+5:302018-08-11T17:40:50+5:30
पावसाने दिली ओढ : शेतकरी चिंतेत
नांदगाव : पावसाच्या वक्र दृष्टीमुळे हवालदिल झालेल्या जळगाव बुद्रुक येथील शेतकरी धनराज बुरकुल यांनी उभ्या मका पिकात बैल सोडले आहेत.
जळगाव बुद्रुक हे गाव माणिकपुंज पाटचारी खाली येते. दरवर्षी येथील पाटचारीला वेळप्रसंगी पूरपाणी सोडले जाते; परंतु यावेळी धरणातच पाणी नाही. विहिरी आटल्या. जनावरांना चारा शिल्लक नाही. चारा विकत घेणे शक्य नाही. पाण्याअभावी सुकत चाललेली मका पिके वाया जाण्याऐवजी जनावरांनाच वैरण म्हणून पर्याय शोधताना उभ्या पिकातच बुरकुल यांनी बैल सोडून दिले.
दरम्यान, साकोरा येथील सरपंच अनिता सोनवणे यांनी मागील आठवड्यात तीन एकर उभ्या उसाचे पीक जनावरांना वैरणीसाठी दान केले होते. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांचा वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे.