बेशिस्त पालिका कर्मचाऱ्यांना दणका
By admin | Published: December 25, 2014 01:23 AM2014-12-25T01:23:08+5:302014-12-25T01:23:28+5:30
१८५ कर्मचाऱ्यांची बिनपगारी : नऊ जणांची रोखली वेतनवाढ; कामचुकार झाले अस्वस्थ
नाशिक : मागील महिन्यात पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतिफांबरोबरच परवानगीशिवाय गैरहजर राहणाऱ्यांना हिसका दाखविला होता. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर पालिका प्रशासनाने चौकशीअंती १८५ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावली असून, गैरहजर राहणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखून तशी सेवापुस्तिकेत नोंद करण्याचे आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्वप्रथम पालिकेच्या बेशिस्त कर्मचाऱ्यांना दणका देत वठणीवर आणले. आयुक्तांच्या आदेशानुसार दि. १५ व १७ नोव्हेंबर रोजी मनपा मुख्यालयासह शहरातील सहाही विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. या दोन्ही दिवशी सहाही विभागांमध्ये पालिकेचे सहायक आयुक्त, उपआयुक्त यांच्यामार्फत हजेरी मस्टर सकाळी १०.३० वाजताच ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. त्यात शनिवार दि. १५ नोव्हेंबरला ४९२, तर सोमवार दि. १७ नोव्हेंबरला २९२ कर्मचारी कार्यालयात काही गैरहजर आणि काही लेटलतिफ आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. महिनाभरानंतर या सर्व कर्मचाऱ्यांचे खुलासे प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी होऊन चौकशी करण्यात आली. त्यात दि. १५ नोव्हेंबर रोजी गैरहजर अथवा लेटलतिफ ४९२ कर्मचाऱ्यांपैकी ३६५ कर्मचाऱ्यांचे खुलासे मान्य करण्यात आले.
उर्वरित १०६ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावण्यात आली, तर ११ कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. दि. १७ नोव्हेंबर रोजी गैरहजर अथवा लेटलतिफ २९२ पैकी १९८ कर्मचाऱ्यांचे खुलासे मान्य करण्यात आले. त्यातील ७९ कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा लावण्यात आली, तर ६ कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. दि. १५ व १७ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी गैरहजर राहणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचा खुलासा अमान्य करण्यात येऊन त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईबाबतची नोंदही संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. पालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)