झाडी एरंडगाव कालवा कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:13 AM2017-08-24T00:13:12+5:302017-08-24T00:13:21+5:30
गेल्या ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करत आहे. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिव्यस्वप्न बनला आहे.
उमराणे : गेल्या ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करत आहे. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिव्यस्वप्न बनला आहे. चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने निवडणुकींच्या माध्यमातून पुढे सरकत आला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंबहुना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कालवा पूर्णत्वाचे स्वप्न दाखवून राजकीय मंडळींनी दाखविले आहे. पाण्याच्या अपेक्षेवर या भागातील जनता निवडणुकांत जो उमेदवार जास्त प्रभावीपणे कालवा पूर्णत्वाचा प्रश्न जनतेसमोर मांडेल त्याला आजपर्यंतच्या निवडणुकांत निवडून दिले आहे. परिणामी हा कालवा जणू राजकीय मंडळींना निवडणुकीचे भांडवल म्हणून बनला आहे. खडतर प्रवासातून मार्गक्रमण करणाºया पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ३६ कि.मी. अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या
उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी देवळा तालुका पूर्वभाग कृती समितीतर्फे दि. १ जानेवारी २०१६ रोजी देवळा येथे रास्ता रोको आंदोलन छेडून पिंपळगाव (वा.), खुंटेवाडी, वाखारी, मेशी, दहीवड, खडकतळे, खारीपाडा, डोंगरगाव, उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वºहाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावांतील जनतेकडून तहसील कार्यालयासमोर चक्री पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आले होते. परंतु शासनाने याची फारशी दखल घेतली नाही. या कालव्याचे पाणी यदाकदाचित खरोखरच झाडी एरंडगावपर्यंत पोहोचवायचे असेल तर चणकापूर ते रामेश्वर धरणापर्यंत कालव्याची वहन क्षमता ५०० क्यूसेसपर्यंत वाढवावी, रामेश्वर धरण ते थेट झाडी एरंडगाव धरणापर्यंतची वहन क्षमता ४०० क्यूसेसपर्यंत वाढवावी. तसेच दहीवड ते झाडीपर्यंतचे अपूर्णावस्थेतील काम लवकर पूर्ण केले तरच खºया अर्थाने अवर्षण प्रवणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याची चव चाखायला मिळेल. अन्यथा आजोबाने बघितलेले स्वप्न नातवावर बघण्याची वेळ येईल व तोपर्यंत कितीतरी पंचवार्षिक निवडणुका या प्रश्नावर लढविल्या जातील.
ठेकेदारांनी काम अपूर्ण ठेवले
या कालव्यांतर्गत दुष्काळी भागात दोन लघुपाटबंधारे, २३ पाझर तलाव, ११ बंधारे त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के भरण्यासाठी चणकापूर धरणातून पूर पाणी देणे नियोजित आहे. त्या अनुषंगाने २००८ साली या धरणातून पूर पाणी प्रवाहित करून रामेश्वर धरणापर्यंत पाणी पोहोचले होते. तेथून पुढील चारीचे काम पुढे सरकत असताना दहीवडजवळील १३ ते १५ कि.मी. अंतरात भुयारी बोगदा आहे. त्यातच ही जमीन वनविभागाची असल्याने त्याची रितसर परवानगी व शासकीय निधीअभावी हा कालवा बरीच वर्षे रखडून पडला होता.
तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व दिवंगत माजी आरोग्यमंत्री डॉ. डी. एस. अहेर यांच्या प्रयत्नांतून भुयारी मार्गाच्या कामासाठी १९.९६ कोटी रुपये मंजूर होऊन काम पूर्ण करण्यात आले. आजमितीस हा कालवा दहीवडपर्यंत येऊन पोहोेचला आहे. तेथून पुढील १६ ते २८ कि.मी. मधील काम वेगवेगळ्या ठेकेदारांकडून केले जात असल्याने काही ठेकेदारांनी काम पूर्ण केले तर काहींचे काम अपूर्णच आहे.