सातपूरला बंटी-बबलीचा थरार
By admin | Published: September 30, 2015 12:06 AM2015-09-30T00:06:29+5:302015-09-30T00:07:09+5:30
सातपूरला बंटी-बबलीचा थरार
सातपूर : वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे त्रस्त असलेल्या सातपूरकरांना मंगळवारी (दि़२९) आणखी एक धक्का बसला़ भर दुपारी एका बंगल्यात शिरून घरमालकाला बांधून ठेवत एका तरु ण-तरु णीने धाडसी घरफोडी करून पलायन केल्याची घटना घडली आहे़ हिंदीतील ‘बंटी और बबली’ या चित्रपटाप्रमाणे घडलेल्या या घटनेने पोलिसांना आव्हान दिले आहे.
गेल्या महिन्यात मौले हॉलजवळील संदीप नगरमध्ये राहणारे डॉ. सुदाम चौधरी यांच्या घरावर तिघांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा त्याच भागातील नीलकंठेश्वर नगरमध्ये राहणारे मायको (बॉश) कंपनीतील सेवानिवृत्त कामगार शंकर बोरसे यांच्या बंगल्यात भरदुपारी घरफोडी झाली. दुपारी एक वाजेच्या सुमारास शंकर बोरसे हे बंगल्यात एकटे असताना एक युवती (अंदाजे वय २०) व एक युवक (अंदाजे वय ३०) घरात आले. या दोघांनी चाकूचा धाक दाखवून बोरसे यांना घरातील प्लास्टिक खुर्चीला बांधून ठेवले व धमकावत किमती ऐवजांची मागणी केली. यानंतर स्वत:च बंगल्यात शोध घेऊन कानातील सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र असा सुमारे २५ हजार रु पयांचे दागिने व खिशातील रोख दीड हजार रु पये असा २६ हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल घेऊन या दोघांनी पलायन केले. यानंतर घाबरलेल्या बोरसे यांनी ओरड केल्याने शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या महिलांनी धाव घेत बोरसे यांची सुटका केली. या कालावधीत बोरसे यांच्या पत्नी नातेवाइकांकडे गेलेल्या होत्या. या प्रकारणी बोरसे यांनी सातपूर पोलिसात फिर्याद दिली आहे़
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे ‘बंटी और बबली’ या चित्रपटाची आठवण झाली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष पोटे करीत आहेत. (वार्ताहर)