अपेक्षांचे ओझे चिंतादायकच!
By admin | Published: January 15, 2017 01:31 AM2017-01-15T01:31:14+5:302017-01-15T01:31:57+5:30
अपेक्षांचे ओझे चिंतादायकच!
किरण अग्रवाल
नाशिक महापालिका निवडणुकीच्या बाबतीत शिवसेना, भाजपा या पक्षांना ‘अच्छे दिन’ आल्याच्या समजातून या पक्षात मोठ्या प्रमाणात तिकिटेच्छुक आलेत. त्यांचा ‘फुगवटा’ हा पक्षातील निष्ठावंतांवर परिणामकारक ठरू पाहत असल्याने पक्ष धुरिणांसाठीही ती आता डोकेदुखीच ठरली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात विरोधकांशी दोन हात करण्यापूर्वी तिकीटवाटप करताना उद्भवणाऱ्या समस्येचा सामना कसा केला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
पचेल तितकेच खाल्लेले चांगले, हा आहारशास्त्रातला साधा नियम. तसा ‘पेलवतील तितकेच घेतलेले बरे’ ही पक्षांतराच्या बाबतीत अनुष्यूत असलेली राजकारणातील साधी सरळ बाब. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून केवळ प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी अगर कमजोर करण्याकरिता जेव्हा आपल्या पक्षाचे दरवाजे सताड उघडे ठेवून वाजवीपेक्षा जास्त लोकांना घरात घुसवून घेतले जाते, तेव्हा कशा संकटाला सामोरे जावे लागते हे शिवसेना-भाजपाला आता उमगले असावे. नाशिक महापालिकेची निवडणूक लढताना अन्य राजकीय विरोधकांऐवजी खुद्द स्वकीयांचीच चिंता बाळगण्याची वेळ या उभय पक्षांवर आल्याचे दिसत आहे ती त्यामुळेच.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हायला काहीसा अवकाश असला, तरी त्यासंदर्भाने कसल्या अडचणी व राजी-नाराजीचा सामना करावा लागेल याच्या चिंतेने शिवसेना, भाजपा धुरिणांना आजच ग्रासलेले दिसत आहे. मुळात, जेव्हा प्रभाग रचना जाहीर झाली व एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे निश्चित करण्यात आले तेव्हा अशी अटकळ बांधण्यात येत होती की, प्रभागाची व्याप्ती वाढल्याने उमेदवारांच्या संख्येवर परिणाम होईल. केवळ पक्षकार्याच्या बळावर निवडणूक लढू पाहणारे उमेदवार कमी होतील, आणि ‘मनी’ व ‘मसल्स’ पॉवरचे ‘मेरीट’ ज्यांच्याकडे असेल तेच यात पुढे येतील. परंतु तसे होत असतानाच काही पक्षांबद्दल अशी काही ‘हवा’ निर्माण होऊन गेलेली दिसत आहे की, सामान्यातल्या सामान्यालाही त्या हवेच्या बळावर सहज मैदान मारून नेण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. यात महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विरोधातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांच्याकडील आजच्या अवस्थेतील ‘नादारी’ची स्थिती सर्वज्ञात आहे, तेव्हा त्याबद्दल फारसे बोलायला नको. ‘मी ट्रेलर दाखवत नाही, थेट पिक्चरच दाखवतो’ असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाय लोकांची ‘नस’ ओळखण्याची कला त्यांच्याकडे असल्याने कुठेच संधी न मिळालेले लोक उमेदवारी मिळवण्याच्या अखेरच्या क्षणी ‘मनसे’च्या गळाला लागतीलही, पण आज घडीला शिवसेना, भाजपाने निवडणुकीच्या माहोलमध्ये आघाडी घेतल्याचे दिसत असल्याने या पक्षांमधील इच्छुकांची संख्या भरमसाठ झाली असून, तीच बाब या पक्षांसाठी डोकेदुखीची किंवा चिंतेची ठरू पाहत आहे.
खरे तर इच्छुकांच्या या संख्यावाढीमागे ‘स्वबळा’चे कारण महत्त्वाचे ठरले आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. शिवसेना-भाजपा हे पक्ष ‘युती’ने निवडणूक लढायचे तेव्हाही तिकिटासाठी गर्दी व्हायचीच, नाही असे नाही. परंतु त्या गर्दीत अधिकतर निष्ठावंत, स्वकीयच असायचे. त्यामुळे त्यातून उमेदवारी दिलेल्याखेरीज जे उरायचे ते फारसा गोंधळ, गडबड न करता मुकाट्याने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या कामाला लागायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. महापालिका स्थापनेच्या १९९२च्या अपवादानंतर पुन्हा गेल्या वेळेपासून दोन्ही पक्षांकडून ‘स्व-बळ’ अजमावले जात असल्याने सर्व जागांवर, आरक्षणनिहाय व त्यातही ‘कॅपेबल’ उमेदवाराचा शोध घेताना बाहेरून आलेल्यांनाही पावन करून घेणे सुरू झाले. यंदा तर एकमेकांना शह-काटशह देण्याच्या नादात शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात ‘भरती’ मोहीम राबविली गेली. अजूनही ती सुरूच आहे व ऐनवेळीही काही जागांसाठी ती होणे अपेक्षित आहे. पण, नवागंतुकांचे प्रमाण यंदा एवढे झाले आहे की, त्यांच्या गर्दीत पक्षातील स्वकीयांचा जीव गुदमरायला होतो आहे. अर्थात कारण उघड आहे, हे जे कुणी पक्षात नव्याने आले आहेत ते पक्षाची प्रचारपत्रके वाटायला आलेले नाहीत. तिकिटावर डोळा ठेवूनच हे लोक आले आहेत. तेव्हा आजवर प्रामाणिकपणे पक्षकार्य करीत आलेले व आज पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत असताना त्या लाटेत संधी मिळवून आपलाही उद्धार करण्याची आस बाळगून असलेले निष्ठावंत यामुळे कमालीचे अस्वस्थ होणे स्वाभाविक ठरले आहे. पण प्रश्न आहे तो तिकिटाची निश्चिती होईपर्यंत राहणारी ही ‘सूज’ नंतर ऐनवेळी एकदम ठसठसू लागली तर कसे व्हायचे हा. कारण, एकदा तिकीटवाटप झाले की मगच खरी आव्हाने समोर येणार आहेत. यातही तिकिटासाठी आलेले तिकिटासाठीच पुन्हा दुसरीकडे चालते झाले तर त्याचे कुणालाही वावगे वाटणार नाही; परंतु निष्ठावंत म्हणवणाऱ्यांत चलबिचल वा पडझड झाली तर ते कोणत्याही पक्षासाठी नुकसानदायी ठरू शकणारे असल्याने त्यादृष्टीने ही बाब आतापासून चिंतेची ठरली आहे.
शिवसेना, भाजपाकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे यामागे आणखीही काही कारणे आहेत. त्यात मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना सक्षम पर्याय म्हणून आपली प्रतिमा उंचावता आलेली नाही हे एक प्रमुख कारण म्हटले पाहिजे. विशेष म्हणजे, शिवसेना व भाजपाने महापालिका ताब्यात घेण्याचे आपले इरादे फार पूर्वीपासून स्पष्ट केले आहेत. पण तरी अन्य राजकीय पक्षांच्या आघाडीवर फारशी सक्रियता दिसून येऊ शकली नाही. अशात शिवसेना ऊठसूट कोणत्याही प्रश्नावर लोकांसमोर येण्याची संधी घेत, आपणच लोकांचे भले करू शकतो हे बिंबवण्यात यशस्वी होताना दिसते आहे तर भाजपासाठी ‘मोदी फॅक्टर’ लाभदायी ठरण्याची त्यांना अपेक्षा आहे. ‘मोदीं’चे गारूडच महापालिकेत भाजपाला तारून जाईल या आशेने अनेकजण ‘कमळा’भोवती रुंजी घालत आहेत. यातून आजघडीस शिवसेना, भाजपाला चांगले दिवस आल्याचे भासत असले तरी, त्यांची स्पर्धा त्यांच्या स्वत:शीच होणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. कारण, प्रत्येकालाच सत्ता म्हणजे विजयाची संधी दिसत आहे. परिणामी प्रत्येकच तिकिटाच्या स्पर्धेत धावत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत समोरच्या, म्हणजे विरोधातील पक्षांसी कसे लढायचे यापेक्षा आपल्याच पक्षात उद्भवू शकणाऱ्या नाराजीची चिंता करावी लागण्यामागेही हेच अनेकांच्या अपेक्षा उंचावून ठेवल्याचे कारण आहे. ‘दूरदृष्टी’ ठेवून घेतलेले निर्णय काहींसाठी जसे लाभदायी ठरून जात असतात, तसे ‘दूरदृष्टी’ न ठेवता करून घेतलेली भरती कशी चिंतेची बाव ठरू शकते हेच यातून स्पष्ट व्हावे.