आदीवासी भागातील महिलांच्या डोक्यावरचे ओझे उतरले ; रोलींग ड्रमचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:24 PM2020-07-06T14:24:08+5:302020-07-06T14:30:01+5:30
डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मेंढपाडा या गावातील आदिवासी महिलांना हाताने ओढण्याचे पाण्याचे रोलिंग ड्रमचे वाटप केले आहे.
नाशिक : काही किलोमीटरवरून डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मेंढपाडा या गावातील आदिवासी महिलांना हाताने ओढण्याचे पाण्याचे रोलिंग ड्रमचे वाटप केले आहे. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी झाले असून त्यांना रोलींग ड्रम ओढणे तुलनेच कमी कष्टाचे ठरू लागले आहे.
मेंढपाडा तसेच परिसरातील भागात महिलांना दुरवरून पाणी आणावे लागते. यासाठी येथील आदिवासी महिला सकाळ, सायंकाळी डोक्यावर एकावर एक असे दोन ते तीन हंडे घेऊन पायपीट करतात. यामुळे त्यांचा अधिक वेळ पाण्यासाठी जाण्याबरोबरच त्यांच्यामध्ये मानेचे दुखणे वाढले होते. ही परिस्थिती आदिवासींसाठी सामाजिक काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाहिली होती. या महिलांचे श्रम कमी करून त्यांचा वेळ वाचवणे व आजारापासून वाचवण्यासाठी त्यांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी व्हावा, या उद्देशाने संस्थेने त्यांना रोलिंग ड्रम देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांना ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज कंपनीची साथ मिळाली. या माध्यमातून येथील महिलांना हे रोलींग ड्रम वाटप करण्यात आले. यावेळी अॅड .गोरक्ष चौधरी , धनंजय जामदार, हेमराज राऊत, प्रदिप महाकाळ, भविनाथ पाडवी, मुरलिधर चौधरी, कमलेश वाघमारे, रोहिदास राऊत व मेंढपाडा या गावातील महिला मंडळ उपस्थित होते.