खान्देशातील रुग्णांचा जिल्ह्यातील रुग्णालयांवर भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:30+5:302021-04-04T04:14:30+5:30
नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, ...
नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही प्रमाणात पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचाही ओढा नाशिक जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात असूनही जिल्ह्यात बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.
नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे दाखल झालेल्या परजिल्ह्यातील रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत्वे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय नंदुरबार, पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय व्यवसाय, नोकरी, कामधंद्यानिमित्त पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये गेलेले नागरिकांनी उपचारांसाठी आपापल्या मूळ गावाकडे येणे पसंत केले. कुटुंबीय, नात्यागोत्यातील व्यक्ती नाशिकमध्ये असल्याने आपली देखभाल नाशिकलाच अधिक योग्य प्रकारे होऊ शकेल, असा विचारदेखील त्यामागे असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यातील बहुतांश नागरिक कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून येत असल्याने अशा नागरिकांमुळेदेखील नाशिकच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.
इन्फो
परजिल्ह्याचे सुमारे २५० रुग्ण
जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून आलेले आणि शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५० हून अधिक आहे. हे बहुतांश रुग्ण अत्यावस्थ असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर अधिग्रहीत झाले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात नाशिकच्या प्रमाणात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बेड नसल्याने त्यांना नजीकच्या मोठ्या शहरात अर्थात नाशिकला येण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पुणे, मुंबईत नोकरीनिमित्त असलेल्या रुग्णांनादेखील त्या तुलनेत कमी खर्चात चांगल्या सोयी असलेले हॉस्पिटल्स नाशिकलाच असल्याने त्यांच्याकडेदेखील नाशिकच्या हॉस्पिटल्सचाच पर्याय उरतो.
इन्फो
परजिल्ह्यातून येणाऱ्यांची चाचणी नाही
जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या नजीकच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कुठेही चाचणी केली जात नाही. तसेच रेल्वेने, बसने येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या करण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी करणे बंधनकारक करणे आता पूर्वीपेक्षाही अधिक अत्यावश्यक झाले आहे.
--------------------------
ही डमी आहे.