साकोरा येथील भरवस्तीतचार घरफोड्या करून चोर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:46 AM2018-02-26T00:46:00+5:302018-02-26T00:46:00+5:30
येथील भरवस्तीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सात-आठ जणांच्या टोळीने चार घरांचे कुलूप तोडून दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा तपास लागल नाही तोच शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नव्या साड्यांची बॅग व मोबाइल चोरून नेल्याने पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
साकोरा : येथील भरवस्तीत गेल्या काही महिन्यांपूर्वी सात-आठ जणांच्या टोळीने चार घरांचे कुलूप तोडून दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याचा तपास लागल नाही तोच शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नव्या साड्यांची बॅग व मोबाइल चोरून नेल्याने पुन्हा एकदा परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. शेवाळेनगरमधील कारभारी तात्याबा बोरसे यांच्या घरातून मोबाइल आणि रोख रक्कम, पोपट कदम यांच्या घरातून नव्या साड्यांची बॅग, गव्हाळी रस्त्यावरील मुंबईकर यांच्या घरातून रोख रक्कम आणि मोबाइल संच, दादा गरूड यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मुलीचे शाळेय दप्तर, परीक्षेचे हॉल तिकीट चोरून नेले. गरूड यांनी नांदगाव पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरांचा शोध घेण्यासाठी परिसरात दोनवेळा पोलिसांनी गस्त घातली. मात्र चोर पळण्यात यशस्वी झाले. दुसºया दिवशी सकाळी गरूड यांच्या शेजारी राहणारे मनोहर बोरसे यांच्या बाथरूममध्ये शालेय दप्तर सापडले व चोरांनी वापरलेले लोखंडी हत्यार शेवाळेनगर पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्याची नोेंद केली आहे. चोरीची घटना घडली त्या दिवशी दुपारी २ वाजेपासून एक अनोळखी माणूस परिसरातील मंदिरात झोपलेला अनेकांनी पाहिला होता; मात्र दुसºया दिवसापासून तो दिसला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. गरूड यांनी मका, कांदे विकून मोठी रक्कम आणल्याची खबर चोरांना लागली असावी आणि म्हणून दिवसभर दारूड्याचा सोंग घेऊन चोर पाळत ठेवून बसला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चोरीच्या अगोदर राम मंदिर चौकात राहणारे शिक्षक रवींद्र बोरसे यांच्या घरी रात्री साडेबारा वाजता चोरी करण्याचा चोरांनी प्रयत्न केला; परंतु बोरसे जागे होते. त्यांनी मोठ्याने आवाज केल्याने चोर फरार झाले. त्यानंतर चोरांनी शेवाळेनगरमधील चार घरांकडे मोर्चा वळवत आपला कार्यभार साधला.
कालिकामाता मंदिरालगत राहणारे दादा देवाजी गरूड यांच्या घरात सर्व झोपेत असताना दाराचा आतल्या बाजूचा कडी कोयंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. गरूड यांच्या पत्नी शोभा झोपेत असताना त्यांच्या अंगावरील सोन्याचे डोरले, पोत, मंगळसूत्र चोरून नेले. पर्स आणि मुलीचे शालेय दप्तर, परीक्षेचे हॉल तिकीट घेऊन पसार झाले.