माजी आमदाराच्या घरातील चोरीचा लागला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:55 PM2021-07-31T22:55:05+5:302021-07-31T22:59:05+5:30
चांदवड : माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या शिवाजी चौकातील बंद घरातून काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. या चोरी प्रकरणात लासलगाव येथून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष पथकाने संशयित रमजू भैय्यालाल पठाण (३९) याला मुद्येमालासह अटक केली आहे.
चांदवड : माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या शिवाजी चौकातील बंद घरातून काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. या चोरी प्रकरणात लासलगाव येथून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष पथकाने संशयित रमजू भैय्यालाल पठाण (३९) याला मुद्येमालासह अटक केली आहे. तर १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्य़ांनी लंपास केला होता. तो मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.
दि. ४ जुलै रोजी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे शेतात वस्तीवर राहण्यासाठी गेल्याचा फायदा घेत त्यांच्या शिवाजी चौकातील राहत्या घरातून घराला लावलेले कुलूप तोडून घरातील मुद्देमाल चोरी गेल्याप्रकरणी राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली होती.
त्यात त्यांनी म्हटले होते की, लोखंडी कपाटातून दहा हजार रुपये रोख त्यात पाचशेच्या सोळा नोटा, शंभर रुपयांच्या २० नोटा, सहा लाख रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र, सोन्याची पोत पंधरा तोळे, तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे कानातील वेल, अंगठी, चांदीचे पायातील तीन जोड, जमीन साठेखत, मूळ कागदपत्र, सही केलेले कोरे स्टॅम्प पेकर, आयकर विभागाचे कागदपत्र, असा एकूण १० लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्येमाल या चोरट्य़ांनी लंपास केला होता.
त्यानंतर राहुल कोतवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होऊन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या विशेष पथकाने लासलगावमधून संशयित रमजू भैयालाल पठाण याला मुद्येमालासह अटक केली असून याबाबत अजूनही काही संशयित आहे काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.