दुचाकीचोरीवरून घरफोडीचा लागला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 01:27 AM2022-06-30T01:27:31+5:302022-06-30T01:27:55+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावला आहे. घरफोडी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ४० ग्रॅम सोन्याची लगड व दुचाकी, असा अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावला आहे. घरफोडी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ४० ग्रॅम सोन्याची लगड व दुचाकी, असा अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच दुचाकी चोरीप्रकरणी आणखी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण पोपट गुंजाळ (रा. कामटवाडा, सिडको) यांच्या घरात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून ६५ ग्रॅम दागिने लंपास केले होते. तसेच ठका करभारी कोल्हे ( ५०, रा. साईबाबानगर) यांची दुचाकी संभाजी स्टेडियमजवळून चोरी झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयितांची पोलीस अंमलदार राकेश राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार किरण गायकवाड, हेमंत आहेर, मच्छिंद्र वाघचौरे, जनार्दन ढाकणे आदींचे पथक तयार करून सापळा लावण्याचे आदेश दिले. घरफोडीतील संशयित आरोपी राहुल धनराज बडगुजर (२६, रा. त्रिमूर्ती चौक) हा दुचाकीने आला असता, साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेत कसून चौकशी केली असता, त्याच्या ताब्यातून चोरी केलेली सोन्याची लगड सापडली. पोलिसांनी त्यास अटक केली असून, सोने व दुचाकी जप्त केली आहे. तसेच अन्य दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची दुचाकी चोरीप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.