नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी
By नामदेव भोर | Updated: August 8, 2023 19:02 IST2023-08-08T19:02:09+5:302023-08-08T19:02:30+5:30
पाथर्डी फाटा येथील माउलीनगर परिसरातील बंगल्याच्या मागील दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी
इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी फाटा येथील माउलीनगर परिसरातील बंगल्याच्या मागील दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश गुंजाळ (४२, ओंकार सदन, पाथर्डी फाटा) आई-वडिलांना मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबीयांसह शनिवारी (दि. ५) गेले होते. ते मुंबईत मुक्काम करून सोमवारी (दि. ७) पहाटे दोन वाजेच्या दरम्यान गुंजाळ कुटुंबीयांसह घरी आले.
घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करताच त्यांना बेडरूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले; तसेच बंगल्याच्या मागील भागातील किचनचा दरवाजा व सेफ्टी डोअरचे लॉक तोडलेले होते. बेडरूममधील कपाटातील सोन्याचे गंठण, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, सोन्याची एअर रिंग, सोन्याची अंगठी, पेंडल मोती व रोख १० हजार रुपये असा एकूण ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. त्यामुळे गुंजाळ यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक ए.व्ही. उघडे या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.