सटाण्यात भरदिवसा तीन ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:54+5:302020-12-22T04:13:54+5:30

सटाणा : शहरात अज्ञात चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत भरदिवसा तीन ठिकाणी घरफोड्या करून ९ लाख ५० हजार ...

Burglary at three places throughout the day in Satna | सटाण्यात भरदिवसा तीन ठिकाणी घरफोड्या

सटाण्यात भरदिवसा तीन ठिकाणी घरफोड्या

Next

सटाणा : शहरात अज्ञात चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत भरदिवसा तीन ठिकाणी घरफोड्या करून ९ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. सध्या लग्नसराई सुरू असून ,भर दुपारी घडलेल्या या मोठ्या घरफोड्यांमुळे शहरवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी शहरातील भाक्षी रस्त्यावरील श्री साईबाबा मंदिरासमोरील श्रीराम कॉम्प्लेक्समधील संजय नारायण लवंगे हे कळवण येथे गेले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. दुसऱ्या घटनेत भाक्षी रस्त्यावरीलच वृंदावन कॉलनीतील गुलाब जिभाऊ पगार हे ठेंगोडा येथे शेतकामासाठी गेले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तिसर्‍या घटनेत साठ फूटी रस्ता पाण्याच्या टाकीलगत टेलिफोन कॉलनीमधील संगीता अशोक मोरे या मुलाचे लग्न असल्याने मालेगाव येथे नारळ फोडण्यासाठी कुटुंबासोबत गेल्या असता त्यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा १ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.

या तीनही घटना भर दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान घडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सूचना केल्या. नाशिकहून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील व पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई पुढील तपास करीत आहेत.

--------------

नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. आपल्या घराची दारे-खिडक्या काळजीपूर्वक बंद करावीत. बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू, दाग-दागिने घरात न ठेवता बँकेत सुरक्षित ठेवावे. कुणी अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या आपल्या परिसरात फिरताना आढळल्यास लक्ष ठेवून कळवावे. पोलिसांबरोबरच जनतेनेही जागरूक व सतर्क राहिले पाहिजे. ‘आपला शेजारी हाच खरा पहारेकरी’ याप्रमाणे प्रत्येकाने काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.

- नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक, सटाणा पोलीस ठाणे

--------------------

अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडून अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य. (२१ सटाणा १)

===Photopath===

211220\21nsk_8_21122020_13.jpg

===Caption===

२१सटाणा १

Web Title: Burglary at three places throughout the day in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.