ठिकठिकाणी जाळपोळ
By admin | Published: October 10, 2016 01:20 AM2016-10-10T01:20:28+5:302016-10-10T01:23:16+5:30
उद्रेक : शहरात बसेसवर दगडफेक; तणावपूर्ण शांतता; बाजारपेठा बंद
नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद शहरात रविवारी (दि़९) उमटले़ अपेक्षेप्रमाणेच नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, घोषणाबाजी तसेच निवेदन देऊन संताप व्यक्त केला, तर अनेक ठिकाणी संतप्त निदर्शकांनी वाहनांची तोडफोड केल्याच्याही घटना घडल्या़ या तोडफोडीच्या घटनांमुळे दुपारनंतर शहरातील शहर वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले़
तळेगाव येथील घटनेचे पडसाद रविवारी मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतील याची कल्पना शनिवारी रात्रीच सोशल मिडीया व्हॉटस-अपवरून पाठविण्यात आलेल्या संदेशांमुळे येत होती़
त्यानुसार सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी युवक, तरुण एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते़ तळेगाव अत्याचारातील संशयितास फाशीची शिक्षा
द्या, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अशा मागण्या यावेळी निदर्शकांकडून केली जात होती़
शहरातील गरवारे पॉर्इंट, विल्होळी, पाथर्डी फाट्यावर निदर्शकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारवर्ग, मुंबईला जाणारी व येणारे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला़ सिडकोतील परिसर तसेच त्रिमूर्ती चौकातील आंदोलनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ (प्रतिनिधी)