सटाण्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 08:42 PM2021-01-15T20:42:09+5:302021-01-16T01:13:17+5:30

सटाणा : उसाच्या शेतामधील लोंबकळलेल्या वीजतारांबाबत महावितरणकडे वेळोवेळी अर्ज फाटे करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दखल न घेतल्याने, वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर ऊस आगीमध्ये भस्मसात झाल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बागलाण तालुक्यातील निताणे येथे घडली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उसाच्या शेताला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Burn three acres of sugarcane in a fire caused by a short circuit in Satna | सटाण्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळून खाक

सटाण्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळून खाक

Next

युवराज केदु पवार असे या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून, निताणे येथील गट नंबर ५७२ मध्ये त्यांनी उसाची लागवड केली होती. २० ऑक्टोबर, २०२० रोजी पवार यांनी महावितरणच्या शाखा अभियंता यांना रीतसर अर्ज केला होता. उसाच्या शेतामध्ये असलेल्या वीजतारांच्या दोन पोलमधील अंतर जास्त असल्याने वीजतारांची झोळी झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता व्यक्त करत, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी अर्जात केली होती. महावितरणच्या शाखा अभियंता यांनी पवार यांच्या तक्रारअर्जावर संबंधित वायरमन यांना आदेश दिल्याचा शेराही मारलेला असताना प्रत्यक्षात मात्र, कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास युवराज पवार यांच्या शेतातील वीजतारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत काढणीला आलेला तीन एकर ऊस खाक झाला आहे.
उसाला आग लागल्याची माहिती परिसरात पसरताच, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत तीन एकर उसांची व त्यातील ठिबक सिंचनाची राख झाली होती. सदर घटनेचा महावितरणने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी युवराज पवार यांनी महावितरणकडे केली आहे.

 

Web Title: Burn three acres of sugarcane in a fire caused by a short circuit in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.