काढणीला आलेला कांदा जाळला

By admin | Published: February 15, 2017 01:01 AM2017-02-15T01:01:44+5:302017-02-15T01:01:56+5:30

नगरसूल : शासनाच्या धोरणाचा निषेध; शेतकऱ्यांमध्ये संताप

Burned onion harvested | काढणीला आलेला कांदा जाळला

काढणीला आलेला कांदा जाळला

Next

नगरसूल : कांद्याच्या भावात निरंतर घसरण सुरू असल्याने उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने नगरसूल येथील शेतकऱ्याने आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून शासनाच्या कांद्याबाबतच्या निष्क्रि य धोरणाचा निषेध केला आहे.
नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी नगरसूल-सायगाव रस्त्यावर कांदा लागवडीसाठी पाच एकर शेत ठोका पद्धतीने घेतले व चार महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड केली. परंतु दरम्यानच्या नोटाबंदीचा फटका या कांद्याला बसल्याने पाच एकरापैकी दोन एकर शेतातील कांदा औषधे व मजुराच्या मजुरीअभावी केवळ २० टक्केच शिल्लक राहिला. उरलेल्या कांद्याला रोगाची लागण झाल्याने खराब झाला; मात्र उरलेल्या तीन एकर क्षेत्रातील कांदा नातेवाइकांकडून उसनवारी करून वाचविला.   सध्या बाजारभावामुळे कांदा बाजार समितीत विक्री करून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात कांदा जाळून टाकला. यापूर्वी कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन मित्रांनी पाणीटंचाईच्या काळात गावापासून १३० किमी अंतरावरील करंजखेड येथे ठोका पद्धतीने कांदा लागवड केली. तेव्हादेखील कांद्याला भाव नसल्याने त्यांनी उत्पादन झालेला १००० क्विंटल कांदा चाळीत साठवणूक केला. परंतु या दरम्यान भाववाढ झाली नाही. त्यामुळे त्यांनी साठवलेल्या कांद्यापैकी ९०० क्विंटल कांदा खराब झाला होता. त्यावेळेस त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये तोटा झाला होता व यंदाच्या कांदा हंगामात पिकविलेल्या कांद्यात त्यांना उत्पादन खर्चदेखील वसूल झाला नसल्याने त्यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृष्णा डोंगरे यांनी सांगितले.  शेती हा डबघाईचा व्यवसाय झाला असून, शासनाचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Burned onion harvested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.