कळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:51 AM2018-08-20T01:51:36+5:302018-08-20T01:51:45+5:30
कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा व डावा कालवा उपविभाग कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. आगीत जिल्ह्यातील प्रकल्प, कालवे यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, अहवाल, तांत्रिक मान्यता आदेश, अभिलेख, गाव नकाशे आदींसह हजारो दस्तावेज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे, संगणक, लाकडी कपाटे,
खुर्च्या व इतर साहित्य खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पुनंद उजवा कालव्याचे शाखा अभियंता दिलीप बच्छाव यांनी फिर्याद दाखल केली.
कार्यालयातील वाहनचालक जगताप यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यालयाला आग लागल्याची माहिती शाखा अभियंता बच्छाव यांना दिली. पहाटे ५ वाजेपूर्वी पुनंद उजवा व डावा कालवा या दोन्ही कार्यालयांना आग लागली.
आगीत पुनंद उजवा व डावा कालवा या वेगवेगळ्या उपविभागातील कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोल्यांना आग लागली कशी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही उपविभागाच्या जळालेल्या खोल्यांमध्ये अंतर अधिक आहे. शिवाय दोन्ही उपविभागाच्या कार्यालयामधील शौचालयाचे वायरिंग जळलेले नसल्याने शंका कुशंका निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक फिटिंग ३० वर्षांपूर्वीचे असल्याने वायरिंग खराब झाल्याने शॉर्टसर्कीट झाल्याचा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला.
आगीत शास्त्रीय व गणिती उपकरणे व पत्रव्यवहार ,सूचना बी पत्रधारिका ,निर्लेखन अहवाल ,ग्रंथालयीन पुस्तके ,वृक्षसंवर्धन ,क्षेत्रकार्य पुस्तके ,तांत्रिक मान्यता आदेश ,अभिलेख अ ,ब ,क तसेच लाभक्षेत्र दाखले ,सामाईक दरसूची ,महात्मा गांधी रोजगार हमी योजना प्रस्तावित अहवाल व अंदाजपत्रक ,गाव नकाशे ,कालव्यांची अंदाजपत्रके ,गाववार क्षेत्र नोंदवही ,पाणी मागणी अर्ज ,भूसंपादन संदर्भातील अपील आदी सह गठ्ठयातील कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत.
आगीत जळालेली कागदपत्रे
रोजगार हमी योजनेंतर्गत पुनंद प्रकल्प कामांसंदर्भातील माहिती, साल्हेर पाझर तलाव, वाघाड कालवा, धनतोरे ल. पा., पिंपळदर पाझर तलाव, पालखेड पाटबंधारे प्रकल्प व कालवा, ओझरखेड प्रकल्प व डावा कालवा, पाणीपट्टी वसुली, पुणेगाव प्रकल्प व कालवा, येवला तालुक्यातील उत्तर भागास पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कागदपत्रे, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प व कालव्याची माहिती व दस्तावेज असलेल्या ११८ गठ्ठ्यांचा समावेश आहे.