नाशिकरोड बसस्थानकातील बस पास खिडकी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:28 AM2018-06-21T00:28:14+5:302018-06-21T00:28:14+5:30
नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. उपनगर बस पास केंद्र बंद करण्यात आल्याने तेथील २२०० हून अधिक बस पासचा भार नाशिकरोड बस पास केंद्रावर पडला असून, पूर्वीप्रमाणेच पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्या सुरू कराव्यात, अशी मागणी पासधारकांनी केली आहे. नाशिकरोड बसस्थानकातून मासिक, त्रैमासिक, विद्यार्थी सवलत व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास दिले जातात. जवळपास ६ हजार ५०० पासधारक पास घेतात. नाशिकरोडसह नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी शहराच्या विविध भागात जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकाच्या पास केंद्रातून पास घेतात.
एक खिडकी बंद झाल्याने गैरसोय
शाळा-महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे मे महिन्यात एसटी महामंडळ प्रशासनाकडून सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत असलेली पासधारकांची एक खिडकी बंद करण्यात आली असून, ती अद्यापपर्यंत पूर्ववत चालू करण्यात आलेली नाही. यामुळे मनमाड, इगतपुरी, लासलगाव आदी ठिकाणांहून रेल्वेने नाशिकरोडला येणारे कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी गैरसोय होत आहे. ज्या विद्यार्थी, कामगारांना सकाळी ८ वाजेपर्यंत शाळा, महाविद्यालय अथवा कंपनीत दाखल व्हायचे आहे त्यांना पास केंद्राची खिडकीच आठ वाजता उघडत असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
नाशिकरोडचा झालेला विस्तार व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांची संख्या व त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन नाशिकरोड बसस्थानकातील पास केंद्राच्या तीनही खिडक्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पासधारक विद्यार्थी, कामगारांनी केली आहे. याबाबत पंचवटी डेपो व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ, वाहतूक निरीक्षक एस. एच. काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
उपनगर बस पास केंद्र बंद
उपनगर सिग्नलजवळ असलेले उपनगर बस पास केंद्र गेल्या नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले असून, तेथील २२०० पासचा बोजा नाशिकरोड बस पास केंद्रावर पडला आहे. त्यातच तीनपैकी एक खिडकी बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवरदेखील कामाचा ताण पडला असून, विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. काठे गल्ली, बोधलेनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, उपनगर आदी आजूबाजूच्या भागातील विद्यार्थी व कामगारांची उपनगर बस पास केंद्र बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे.
नाशिकरोड बसस्थानकात पासधारकांसाठी सुरू होणारी पहिली खिडकी सकाळी ७ वाजता उघडून दुपारी ३ वाजता बंद होते. दुसरी खिडकी सकाळी ८ वाजता उघडून दुपारी ४ वाजता बंद होते, तर तिसरी खिडकी सकाळी १० वाजता उघडून सायंकाळी ६ वाजता बंद होत होती. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पासधारकांसाठी असलेले हे वेळापत्रक अत्यंत सोयीचे होते.