देवळा कोरोनामुक्त झाल्याने बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:10 PM2020-07-18T22:10:27+5:302020-07-19T00:38:57+5:30
देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे.
देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे. यामुळे बससेवेवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसला तरी नियमितपणे बससेवा सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक भूषण आहेर यांनी दिली आहे.२८ जून रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर १३ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येऊन त्याचे सर्वत्र पालन करण्यात आले. यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यात देवळा शहर यशस्वी झाल्याचे चित्र शहर कोरोनामुक्त झाल्यानंतर दिसून आले. शहरातील सर्व व्यवसाय आता पूर्ववत सुरू झाले आहेत. कोरोनामुळे तीन महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरू झाल्यामुळे सुनसान पडलेले बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे.
दिवसभरात मनमाड आगाराच्या मनमाड - कळवण (दोन फेऱ्या), मनमाड - सटाणा (एक फेरी) व कळवण आगाराच्या देवळ्यापर्यंत चार फेºया सुरू आहेत. तसेच सटाणा आगाराच्या सटाणा - मनमाड (दोन फेºया) व सटाणा-देवळा (तीन फेºया) सुरू आहेत. आठवडाभरापासून देवळा बसस्थानकावरून सटाणा, कळवण व मनमाड आगाराची बससेवा सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एका बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून २१ प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत वाहकांना सूचना देण्यात आली आहे. आगारातून निघतानाच बस सॅनिटाइज केली जाते. तसेच वाहकाकडे सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- भूषण आहेर, वाहतूक नियंत्रक, देवळा बसस्थानक