नाशकातील बस स्थानके झाली चोरट्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 05:51 PM2019-11-02T17:51:56+5:302019-11-02T17:55:09+5:30
जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
नाशिक : शहरातील जुने, नवे मध्यवर्ती बस स्थानक चोरट्यांचा अड्डा बनले असून शुक्रवारी एकाच दिवशी दोन्ही बसस्थांब्यांवर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या खांद्यावरील बॅगेतून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐेवड चोरट्यांनी चोरून नेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त परिसरात राहणारे जया पांडुरंग काळे (६१) जुने सीबीएस येथे एसटीमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खाद्याला लावलेल्या बॅगेतील ५७ ग्रॅम वजनाची काळेमणी व सोन्याची पट्टी व सोन्याची पळी असलेली सोन्याची पोत असा १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे दागिने व २७ ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टी, सोन्याचे पेंडल असलेली सोन्याची पोत असा ८१ हजार रुपयांचा मिळून सुमारे २ लाख ५२ हजार रपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी जया काळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अशाच प्रकारची चोरीची घटना ठक्कर बाजार येथेही घडली आहे. या घटनेत पुणे येथील ज्योती भारत महाजन नाशिक-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन ज्योती महाजन यांच्या खांद्याला लावलेल्या बॅगमधून सुमारे ६ हजार सहाशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यात पर्ससह मोबाइल आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार निक म या प्रकरणाचा तपास करीत आहे.