महामंडळाच्या योजनेची ‘बस’ रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:22 AM2018-11-06T01:22:58+5:302018-11-06T01:23:21+5:30
महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एकही स्टॉल्स लागू शकला नाही.
नाशिक : महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एकही स्टॉल्स लागू शकला नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांनी अभिनव योजना राबवून बसस्थानकावरच दिवाळीचा फराळ मिळू शकेल यासाठी योजनेची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात अनेक महिला आणि महिला बचतगट, सामाजिक संस्था नानाविध वस्तू स्वत: तयार करून त्या बाजारात विक्रीसाठी आणतात. अनेक महिला बचतगट आणि संस्था या दिवाळीचा फराळ, पणत्या, माळा, तोरण, आकाशकंदील, शोभिवंत फुलझाडे, शोभेच्या वस्तू अशा अनेक वस्तू तयार करून विकतात. या महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच दिवाळीची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केवळ एक रुपया भाडेतत्त्वावर बसस्थानकांमध्ये स्टॉल्स लावण्याची परवानगी देण्यात आली होती.
बसस्थानकावरील गर्दीचा लाभ या बचतगटांना होऊ शकला असता त्यामुळे त्यांच्यासाठी ही चांगली संधी होती. परंतु ही योजना संबंधितांपर्यंत पोहचू शकली नसल्याने नाशिकमध्ये एकाही बचतगट अथवा संस्थांनी जागेसाठी नोंदणी केलेली नाही. इतकेच नव्हे तर या योजनेबाबत साधी विचारणादेखील झाली नसल्याने महामंडळाची ही चांगली योजना केवळ कागदावरच राहिली आहे. दिवाळीत महिला बचतगटांना हातभार लागण्यासाठी ही चांगली संकल्पना अंमलात आणली गेली. विशेषत: आदिवासी भागातील कलाकारांना याचा चांगला उपयोग होऊ शकला असता. परंतु जेथे शहरासारख्या ठिकाणच्या बचतगटांना काहीच माहिती होऊ शकली नाही तेथे आदिवासी भागात ही योजना पोहचणे अशक्य झाल्याने योजना फसली.
अधिकारीही अनभिज्ञ
महामंडळाच्या या योजनेविषयी परिवहन महामंडळाच्या ठक्कर बझार, महामार्ग बसस्थानक आणि जुने सीबीएस येथे चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचे उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांनी दिले. विभागीय कार्यालयातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. येथील कामगारांना आणि त्यांच्या नेत्यांनाही या योजनेविषयी काहीच सांगता आले नाही. फक्त विभागीय वाहतूक अधिकाºयांनाच योजनेची कल्पना होती, असे दिसून आले.
महिला बचतगट आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने खरेच असा काही उपक्रम राबविला असेल तर ही चांगली बाब आहे. मात्र या योजनेविषयी बचतगटांना काहीच माहिती नाही. बचतगटांना विश्वासात घेण्यात आणि त्यांच्यापर्यत योजना पोहचविण्यात महामंडळ कमी पडले असेच म्हणावे लागेल. - अश्विनी बोरस्ते, नाशिक जिल्हा व महिला बचतगट संस्था, अध्यक्ष