रस्ते बुडाल्याने जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:32 AM2019-08-05T00:32:37+5:302019-08-05T00:32:58+5:30
नाशिक : गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धुळे वगळता इतर मार्गांवरील सर्व वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला आलेला पूर आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बससेवा दुपारी बारा वाजेनंतर पूर्ण विस्कळीत झाली. पेठ आणि सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने या मार्गावरील सर्व बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील अनेक लहान पूूल आणि फरशीपूल पाण्याखाली गेले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पेठ येथील रस्त्यांवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला प्रशासनाने मनाई केलेली आहे. याबरोबरच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे अडीचशे ते तीनशे मि.मी. पाऊस होत असल्यामुळे या मार्गावरील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणि ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने बसेस थांबविण्यात आल्या तर काही बसेस माघारी पाठविण्यात आल्या आहेत.चांदवड, मनमाड, येवला आणि सटाणा येथील बससेवा वगळता अन्य मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक-पेठ मार्गावरील चापडगाव येथे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असल्याने वाहतूकही विस्कळीत झालेली आहे. तसेच कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे घोटी-इगतपुरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.