बसची साथ सुटल्याने गहिवरला चालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:12 PM2017-12-27T23:12:52+5:302017-12-27T23:43:18+5:30
आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही.
नाशिक : आयुष्यभर जिने साथ दिली, रोजीरोटी दिली, जगणे शिकविले, माणसे भेटविली अशी बस उद्यापासून सोबत राहाणार नाही. बस सोबतचा रोजचा प्रवास आता थांबेल, अशी खंत व्यक्त करताना त्या बसकडे पाहून चालकाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांचेही.
एखाद्या चालकाला आपल्या बस विषयीचा इतका जिव्हाळा आणि आत्मियता असू शकते याची प्रचिती गिरणारे येथील एका कार्यक्रमात आली. पंचवटी-गिरणारे बसचे चालक राजेंद्र टोकसे हे ३० रोजी सेवानिवृट होत आहेत. यानिमित्ताने गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कृतज्ञता कार्यक्रमात टोकसे यांनी मनाला भिडणारी आपली बस विषयीची ही भावना व्यक्त केली.
त्यांनी हौस म्हणून बसची सजावट केली नाही तर आपल्या सेवा काळात बसशी जुळलेले ऋणानुबंध त्यांना अस्वस्थ करीत असल्याने यापुढे बस सुटणार म्हणून त्यांनी लाडाकोडाने बसला सजविले. त्यांनी बसकडे केवळ बस म्हणून कधीच बघितले नाही तर ही आपली जीवनवाहिनी आहे असेच ते सांगतात. जीवनाला आणि जगण्याला अर्थ देणारी बस ही आयुष्यातील एक अविभाज्य भाग असल्याने बसला विसरणे कधीही शक्य नसल्याने बसची सजावट त्यांनी केली. बसची सजावट करताना आपल्या मातेविषयी असलेली भावना बस विषयी असल्याचे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
बस मला मातेसमान
रोजीरोटी नव्हे तर बस मातेसमान आहे. सेवाकाळात तिचा आशीर्वाद मिळाल्याने संसार झाला, दोन्ही मुले शिकली. आज जे काही आहे ते बसच्याच जिवावर. सेवाकाळातील अखेचा दिवस या बसच्या सोबतीने पूर्ण केल्याचे समाधान आहे. बस केवळ चालविली नाही तर तिची तन-मनाने सेवा केली. तिच्या कृपाशीर्वादामुळे उभा आहे. तिचे ऋण फेडण्यासाठी ड्यूटीच्या शेवटच्या दिवशी बस सजवून कृतज्ञता व्यक्त केली.
- राजेंद्र टोकसे,
चालक पंचवटी आगार