बसेसपाठोपाठ ६०० चालक-वाहकही शहराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:25+5:302021-07-14T04:18:25+5:30
अर्ज मागविले : निमाणी डेपोतील कर्मचाऱ्यांचे इतर डेपोंमध्ये होणार समायोजन नाशिक : गेल्या ८ जुलै रोजी नाशिक ...
अर्ज मागविले : निमाणी डेपोतील कर्मचाऱ्यांचे इतर डेपोंमध्ये होणार समायोजन
नाशिक : गेल्या ८ जुलै रोजी नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाली आणि एसटी महामंडळाने शहरातील बससेवा बंद करण्यावर शिक्कामोर्तब केले. आता शहरातील बसेस ग्रामीण भागात वापरण्यात येणार असल्याने या बसेसवरील चालक-वाहकांना शहराबाहेर जाण्याची वेळ आली आहे. सुमारे ६५० कर्मचाऱ्यांकडून विनंती बदलीसाठीचे अर्ज भरून घेण्यात आले असून पुढील दोन दिवसांत त्यांच्या समोयोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शहरातील प्रवासी वाहतूक सेवा चालविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने शहरात प्रवासी वाहतूक करण्यास नकार दिला होता. गेल्या तीन वर्षांपासून तर शहरातील अनेक मार्गांवरील बसेस काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कोरोनाच्या संसर्गाच्या निमित्ताने शहरातील सर्वच बस वाहतूक महामंडळाने बंद केली.
नाशिक महापालिकेची बससेवा सुरू होण्यापूर्वी शहरातील प्रवासी वाहतूक एसटी बसच्या माध्यमातून सुरू होती. सुरुवातीला सुमारे १५० ते १८० बसेसच्या माध्यमातून शहरातील प्रवासी वाहतुकीचा भार महामंडळाने वाहिला. शहरीकरण वाढत गेल्याने, खासगी प्रवासी वाहनांची संख्या वाढल्याने प्रवासी कमी झाल्याने १०० ते १२० बसेस शहरात धावतच होत्या. पंचवटीतील निमाणी डेपोतून शहरातील ९० टक्के प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले जात होते. उर्वरित बसेस या नाशिक रोड स्थानकातूनही सोडल्या जात होत्या. जवळपास ६५० कर्मचारी शहर प्रवासी वाहतुकीच्या नेमणुकीला होते. आता शहर बसच थांबल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना बदलीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
निमाणी डेपोत २६७ चालक, ३४३ वाहक आणि ८८ तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना विनंती बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. गेल्या ७ तारखेपर्यंत त्यांच्याकडून बदलीचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे इतर डेपोमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केले नाहीत त्यांचे प्रशासनाच्या वतीने रिक्त जागेवर समायोजन केले जाणार आहे. त्यामुळे आवडीच्या डेपोत नियुक्ती मिळावी यासाठी जवळपास ९० टक्के कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.
--इन्फो--
बंदचा निर्णय; सुरू करण्याचे काय?
महापालिकेची बससेवा सुरू झाल्याने महामंडळाच्या शहरासाठीच्या बसेस आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बसेस ग्रामीण भागात सुरू करण्याबाबतचे कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. सध्या जवळपास १८ बसेस ग्रामीण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. इतर बसेस मात्र पंचवटीतील वर्कशॉपमध्ये उभ्या आहेत. पूर्ण क्षमतेने बस वापरण्याबाबतचे अद्यापही नियोजन करण्यात आलेले नाही.
--इन्फो--
निमाणी डेपोतील कर्मचारी
चालक: २६७
वाहक: ३४३
तांत्रिक कर्मचारी : ८८
शहरी बसेस: ९८