पाटोदा-लासलगाव मार्गावर मोडकळीस आलेल्या बसेस
By admin | Published: February 27, 2016 10:44 PM2016-02-27T22:44:19+5:302016-02-27T22:55:14+5:30
दे धक्का : नियोजित मार्गातही केला जातो अचानक बदल
पाटोदा : येवला-पाटोदा- लासलगाव या मार्गावर येवला आगारातून प्रवाशांसाठी मोडकळीस आलेल्या व खिळखिळ्या झालेल्या नादुरुस्त बसेसचा वापर होत आहे, तसेच बसच्या नियोजित मार्गातही अचानक बदल केला जात असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवासी सदाशिव शिंदे यांनी आगारप्रमुखांना दिला आहे.
पाटोदा व परिसरातून शेकडो प्रवासी व विद्यार्थी येवला येथे रोज बसने ये-जा करतात. लासलगाव ते येवला हे अंतर ३२ कि.मी. असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. परंतु आगाराकडून प्रवाशांना नेहमीच वेठीस धरले जात आहे. या मार्गावर फेऱ्या मारणाऱ्या बसेसच्या खिडक्या तुटलेल्या, सीट गायब, चालकाकडील दरवाजाची दयनीय अवस्था, खिडक्याच्या काचा गायब झालेल्या आहेत. नादुरुस्त, खराब रस्त्यावरून या बसेस धावल्या तर नुसता आवाज येतो.
अशा नादुरुस्त बसेसचा आगाराकडून सर्रास वापर केला जात आहे. यामुळे तालुक्याचे ठिकाण गाठणे प्रवाशांना कठीण होत आहे. नादुरुस्त व खिळखिळ्या असल्याने ह्या बसेस कोठे बंद पडेल, याचा नेम नाही. अनेक बसेसना प्रवाशांना दरवाजा उघडण्यासाठी लाथा माराव्या लागतात. अनेकवेळा मार्गातच काही बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना सदर बसेस धक्का देऊन चालू कराव्या लागत आहे. असे प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा वापर करीत आहे. (वार्ताहर)