निवडणुकीच्या दिमतीला जिल्ह्यातील बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:03 AM2019-04-29T01:03:23+5:302019-04-29T01:03:48+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसच नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसच नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ऐन लग्नतिथीत स्थानकात बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने नाशिकसह जिल्ह्यातील डेपोंमधील सुमारे ४८६ बसेस निवडणुकीच्या दिमतीला दिल्या आहेत. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातील बसेस या जमा करण्यात आल्याने स्थानकात बसेसच नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बसेस नसल्याबाबतची सूचना देण्यात आली नसल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. स्थानकात बस येण्याची वाट पाहून अनेकांनी अखेर तेथून काढता पाय घेत खासगी वाहनाने पुढील प्रवास केला.
या निवडणुकीसाठी नाशिकसह निफाड, लासलगाव, इगतपुरी, पेठ आणि येवला या डेपोंमधील बसेसदेखील देण्यात आल्यामुळे नाशिकबरोबरच या डेपोंवरदेखील प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामीण भागातील डेपोंमधून आसपासच्या गावांमध्ये जाणाºया बसेसही धावत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक बसेसवर अवलंबून असतात. मात्र जिल्ह्यातील डेपोंमध्ये बसेसच नसल्याने प्रवाशांना अनेक अडणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागात एक-दोन बसेस सोडल्या तर अन्य मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. नाशिकमध्ये परराज्यातून येणाºया बसेसमधून अनेकांनी नाशिक गाठले तर एका गावातून दुसºया गावात जाणाऱ्यांना तर उन्हातान्हात पायी चालत जावे लागले. जिल्हाभरातील स्थानकात बसेस नसल्यामुळे ग्रामीण भागात ऐन लग्नसराईला प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
काळी-पिवळी जीपचे डबल भाडे
जिल्हाभरातील डेपोंमध्ये बसेसच नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. जुने सीबीएस येथे बसेस न मिळाल्यामुळे प्रवाशांना द्वारका येथे जाऊन खासगी काळी-पिवळी जीपने पुढील प्रवास करावा लागला. मात्र बसेसची संख्या कमी असल्यामुळे खासगीचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारणी केली. त्यातच लग्नसराई असल्यामुळे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने याचा लाभ उठवत खासगी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले.