निवडणूक ड्यूटीवरील बसेस मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:59 AM2019-05-01T00:59:37+5:302019-05-01T00:59:59+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सुमारे ४८६ बसेस निवडणूक कामासाठी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप पोहोचवून या बसेस आता मार्गावर आल्याने प्रवासी वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सुमारे ४८६ बसेस निवडणूक कामासाठी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप पोहोचवून या बसेस आता मार्गावर आल्याने प्रवासी वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सामग्री पोहोचविणे आणि परत आणणे या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ४८६ बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दि. २८ आणि २९ असे दोन दिवस जिल्ह्यातील प्रवासी यंत्रणा कोलमडून पडली होती. जुने सीबीएस येथे ग्रामीण भागात धावणाºया बसेसच नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गेल्या रविवारी ऐन लग्नतिथीत स्थानकात बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला होता.
दि. २८ रोजी मतदान साहित्य आणि कर्मचाºयांना पोहोचविण्यासाठी आणि दि. २९ रोजी मतदान यंत्रे आणि कर्मचाºयांना संबंधित गुदामाच्या ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी परिवहन महामंडळाच्या बसेसने बजावली. सोमवारी सायंकाळी अनेक बसेस पुन्हा महामंडळाच्या सेवेत रुजू झाल्या. दि. २८ रोजीदेखील कर्मचारी आणि साहित्यांना इच्छितस्थळी पोहोचविल्यानंतर बसेसची सेवा संपली असली तरी ब्रेकडाउनची शक्यता गृहीत धरून या बसेसला कोणत्याही मार्गांवर पाठविण्यात आले नव्हते. निवडणूक संपताच आता सर्व बसेस पूर्ववत करण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
ग्रामीण भागात एक-दोन बसेस सोडल्या तर अन्य मार्गांवरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. जिल्हाभरातील स्थानकात बसेस नसल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात दोन दिवस बसेस उपलब्ध राहणार नसल्याची माहिती डेपोंमधून मिळत नसल्याने प्रवासी तासन्तास बसेसची वाट पाहत होते. बसेस नसल्याची माहिती काही तासांनी मिळाल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला होता.
ग्रामीण भागातील बसेसही वापरल्या
राज्य परिवहन महामंडळाने नाशिकसह जिल्ह्यातील डेपोंमधील सुमारे ५०० बसेस निवडणुकीच्या दिमतीला दिल्या होत्या. नाशिकसह निफाड, लासलगाव, इगतपुरी, पेठ आणि येवला या डेपोंमधील बसेसदेखील देण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. नाशिकबरोबरच ग्रामीण भागातील डेपोंमधील प्रवाशांची गैरसोय झाली.