ग्रामीण भागात जाणाऱ्या बस सुसाट; रात्रवस्ती गाड्या कधी धावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:01+5:302021-09-02T04:32:01+5:30
नाशिक: कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने आता एस.टी. महामंडळाच्या बसलाही गती येऊ लागली आहे. प्रवासी संख्या वाढत असल्याने आता ...
नाशिक: कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने आता एस.टी. महामंडळाच्या बसलाही गती येऊ लागली आहे. प्रवासी संख्या वाढत असल्याने आता बऱ्यापैकी बस सुरू झाल्या आहेत. सुमारे ८० टक्के बस सुरू झाल्याचा दावा महामंडळाकडून केला जात आहे; मात्र रात्र मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार याबाबतची स्पष्टता नसल्याने प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिकमधूनही जिल्ह्यात जवळपास ९६ रात्रवस्ती बस धावतात. कोरोनामुळे बस बंद होण्यापूर्वी नाशिक विभागातून ९० पेक्षा अधिक बस सुरू होत्या, परंतु कोरोनाचा प्रभाव कमी होऊनही या बस सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
--इन्फो--
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांनाही जागा मिळेना
राज्य परिवहन महामंडळाने बस सुरू केल्या असल्याने ग्रामीण वाहतूकही रुळावर आली आहे. या बसला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक मार्गांवरील फेऱ्या देखील वाढविण्यात आलेल्या आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसमध्ये प्रवाशांना जागा देखील मिळत नसल्याचे दिसते. अनेक मार्गांवरील बसला प्रवाशांची गर्दी होत आहे; मात्र प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत याची दक्षता घेतली जात असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
--इन्फो--
तालुका पातळीवर बसही फुल्ल
१) नाशिकमधून तालुक्याच्या गावांना धावणाऱ्या बसला गर्दी वाढत असल्याने उत्पन्नाला हातभार लागला आहे.
२) सध्या औरंगाबाद, धुळेे आणि पुणे येथे जाणाऱ्या बसला प्रवाशांची गर्दी होत आहे. रात्री देखील या बस फुल्ल होत आहेत.
३) रात्र मुक्कामी असलेल्या बसला देखील चांगला प्रतिसाद असल्याने या बस सुरू करण्याबाबतची मागणी होत आहे.
--कोट--
मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास
नाशिकमध्ये येण्यासाठी आम्हाला लासलगाव डेपोची मुक्कामी येणारी गाडी फायद्याची होती. सकाळी गावातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असायची. आता बस बंद असल्यामुळे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले असून शहरातील कामे रखडली आहेत. एखाद्याच्या वाहनात डिझेल भरून आम्हाला जावे लागते. अशी समस्या कधी आली नव्हती.
- बाळासाहेब कारळे, प्रवासी, देवरगाव.
रात्रवस्तीच्या गाडीमुळे गावाचे वेळापत्रक ठरलेले असते. परंतु आता हे समीकरणच बिघडले आहे. गावासाठी मुक्कामी गाडी आणि चालक, वाहक हे गावाचाच एक भाग मानले जातात. प्रवासाची आता अडचण होत असली तरी लाल डब्याच्या गाडीमुळे जे नाते निर्माण झालेले आहे त्याची ताटातूट झाल्याचे वाटत आहे. रात्र मुक्कामी एस.टी. सुरू होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.
- शंकरशेठ पेणमहाले, प्रवासी, पिंपळनारे.
--इन्फो--
नाशिक जिल्ह्यातील १३ डेपोंमधून रात्र मुक्कामी बस सोडल्या जात होत्या. फेब्रुवारी २०२१ मध्ये रात्रवस्ती बसच्या ३२० फेऱ्या होत होत्या. जून २०२१ मध्ये ९६ फेऱ्या झालेल्या आहेत. त्यानंतर मात्र बंद असलेल्या बस अजूनही बंदच आहेत.