एकाच जागेवरील बसेस धुळीने माखल्या; काचा फुटल्या, सीटही फाटले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:29+5:302021-06-03T04:11:29+5:30
नाशिक : मागील वर्षी तीन महिने आणि यंदा केवळ दोन महिने बसेस सुरू राहिल्यानंतर पुन्हा बसेस आगारात उभ्या करून ...
नाशिक : मागील वर्षी तीन महिने आणि यंदा केवळ दोन महिने बसेस सुरू राहिल्यानंतर पुन्हा बसेस आगारात उभ्या करून ठेवण्याची वेळ आल्याने बसेसच्या मेंटेनन्सचा प्रश्न महामंडळापुढे निर्माण झाला आहे. डेपो स्तरावर अनेक ठिकाणी बसेस एकाच जागी उभ्या असल्याने बसेसची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ज्या बसेस चालविण्याची आवश्यकता आहे अशाच बसेसवर लक्ष दिले जात असल्याने अन्य बसेस धूळखात पडून आहेत.
सातत्याने दोन वर्षे एस.टी. महामंडळाला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. जास्तीतजास्त बसेस उभ्या करून ठेवण्याची वेळ आल्यामुळे बेससेच्या मेंटेनन्सवर महामंडळाला मोठा खर्च करावा लागत आहे. बसेसच्या बॅटऱ्या उतरू नयेत म्हणून बसेसला दर दोन दिवसांनी स्टार्टर मारावा लागत आहे. बसेस एकाच जागेवर उभ्या असल्यामुळे टायर्सला क्रॅकदेखील पडत असल्याचे सांगितले जात आहे. प्रवासी वाहतूक नसल्यामुळे बसेस आतून धुतल्याही जात नाहीत. त्यामुळे आगारात उभ्या असलेल्या बसेस धूळखात पडून आहेत.
एकाच जागी उभ्या असलेल्या बसेसचा मेंटेनन्स करण्याच्या सूचना कार्यशाळा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हा पातळीवर असलेल्या १३ डेपोंमध्ये अनेक बसेस अजूनही उभ्याच आहेत. त्या बसेसची काय अवस्था आहे याची माहिती कार्यशाळा विभागालादेखील नसल्याने बसेसची दुरवस्था होतच आहे.
--इन्फो--
काचा फुटल्या
आगारांमध्ये उभ्या असलेल्या अनेक बसेसच्या काचा फुटलेल्या असल्याचे दिसून आले. बसेसच्या मागील बाजूची काच फुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
--इन्फो--
टायर पंक्चर
आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायर्सची हवा निघून गेल्यान टायर्स बसले आहेत. काही टायर्स पंक्चरदेखील झाले असून, त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचेही दिसले.
--इन्फो--
आरसे तुटले
आगारात तसेच कार्यशाळेच उभ्या असलेल्या अनेक बसेसचे आरशे तुटलेले आणि फुटलेले आहेत. बसेस मागे-पुढे करताना आरसे फुटतच असल्याचे उत्तर देण्यात आले.
--इन्फो--
आधीच दुष्काळ
राज्य परिवहन महामंडळ मागील वर्षीपासून आर्थिक संकटात सापडलेले असताना दुसऱ्या लाटेतही महामंडळाला बसेस बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाला सलग दुसऱ्या वर्षीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
--इन्फो--
१३
जिल्ह्यातील आगार
३००
एकूण बसेस
--इन्फो--
वर्षातून फक्त दोन महिने रस्त्यावर
मागील वर्षीच्या निर्बंधानंतर या वर्षी जानेवारीत बसेस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने तोट्यातच बसेस चालविण्याची वेळ आली. जानेवारीतही महामंडळाला फारसे उत्पन्न मिळाले नाही. प्रवासी वाढत गेल्याने फेब्रुवारीत काही प्रमाणात बसेस वाढविण्यात आल्याने गाडी रुळावर येत असल्याचे दिसत असतानाच मार्च महिन्याच्या पंधरवड्यात पुन्हा बसेस बंद करण्याची वेळ आली.
--इन्फो--
आता खर्च किती येणार
बसेस बंद असल्यामुळे मेंटेनन्सवर फारसा खर्च होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या टायरचा घसारा होत नाही तर डिझेलचीही बचत होत असल्याने खर्च होत नाही. बॅटरी उतरू नये म्हणून बसेस सुरू करून बंद केल्या जातात. सध्या मेंटेनन्सवर केवळ ३० टक्के खर्च येत असल्याचे सांगण्यात आले.
--कोट--
सध्या बसेसचा घसारा नसल्याने मेंटेनन्सवर फार खर्च होत नाही. बसेस चालू स्थितीत राहतील याची काळजी घेतली जात आहे. बसेस दुरुस्त करण्याबाबत तातडीने कारवाई केली जात आहे. आगार व्यवस्थापकांना दुरुस्तीसाठी बसेस कार्यशाळेकडे पाठविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
- मुकुंद कुंवर, वरिष्ठ यंत्र अभियंता