दुपारनंतर बसेस सुरू; मात्र पायपीट कायम
By admin | Published: September 26, 2015 12:02 AM2015-09-26T00:02:20+5:302015-09-26T00:03:55+5:30
गर्दी आवरेना : मेळा स्थानकात बसेसना पोलीस बंदोबस्त
नाशिक : भाविकांच्या संख्येचा अंदाज न येऊन नियोजन कोलमडल्याने बंद कराव्या लागलेल्या बसेस शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा सुरू झाल्या; मात्र भाविकांची पायपीट कायम होती. भाविकांची गर्दी आवरत नसल्याने मेळा स्थानकातून पोलीस बंदोबस्तात बसेस सोडल्या जात होत्या.
तिसऱ्या पर्वणीला त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकमधून नाशिकरोड, महामार्ग, मेळा, निमाणी बसस्थानक आदि ठिकाणांहून बसेस सोडण्याचे नियोजन होते. रात्री अकरा वाजेनंतर ठिकठिकाणांहून भाविकांचा ओघ त्र्यंबकेश्वरकडे सुरू झाला. भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ लागल्याने अखेर पहाटे तीन वाजता बसेस थांबवण्यात आल्या. त्यानंतरही भाविक त्र्यंबककडे पायी निघाले होते. पहाटे तर भाविक अक्षरश: पपया नर्सरीपासूनच पायी रवाना होत होते. सकाळी ११ वाजेनंतर बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यातून दुपारी दीड वाजेपर्यंत भाविकांची वाहतूक सुरू होती; मात्र पुन्हा गर्दी वाढल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत बसेस बंद करण्यात आल्या. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मेळा स्थानकातून बसेसच्या अवघ्या पन्नास फेऱ्या झाल्याचे सांगण्यात आले.
सदर बसेसद्वारे भाविकांना ब्रह्मा व्हॅलीपर्यंत सोडले जात होते. तेथून भाविकांना पायपीट करीतच त्र्यंबक गाठावे लागत होते. दरम्यान, भाविकांचा ओघ वाढल्याने पोलिसांनी खासगी वाहने पपया नर्सरीलाच रोखण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात सायंकाळी भाविक व वाहनांची प्रचंड गर्दी झाली. बसेस भाविकांनी पूर्णत: भरून येत असल्याने पोलीस बळाचा वापर करीत त्यात भाविकांना बसवत होते. अनेक बसचालक व नियंत्रक पोलिसांना जागा नसल्याचे सांगूनही कित्येक बसेसमध्ये भाविक अक्षरश: कोंबले जात होते. पपया नर्सरी परिसरात दुपारी ११ ते ३ या वेळेत स्वत: पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ग्रामीण पोलिसांशी संपर्कात राहून बसेस सोडण्याचे नियोजन करीत होते. (प्रतिनिधी)