नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसेस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:05 PM2018-01-02T21:05:24+5:302018-01-02T21:12:20+5:30
भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या.
एस.टी. महामंडळ : चार बसेस फोडल्या
नाशिक : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पुणे येथील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या तणावानंतर बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथून निघणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या तर नाशिकहून निघणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. जेलरोड येथे दोन तर नाशिकरोड, वडाळा नाका, कॅनडा कॉर्नर परिसरात बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले. पुण्यात तणाव निर्माण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, औरंगाबाद, धुळे आणि नाशिकमध्येही घटनेचे लोण पसल्याने अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या शहरांमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर अनेक बसेस या आहे त्या ठिकाणी थांबविण्यात येऊन खबरदारी घेण्यात आली.
नाशिकच्या ठक्कर बसस्थानक येथून निघणाऱ्या शिवशाही बसेस पूर्णपणे थांबविण्यात आलेल्या असून धुळे, औरंगाबाद येथील बसेसही दुपारनंतर बंद करण्यात आल्या होत्या. महामार्ग येथून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही तसेच इतर बसेसही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. भुसावळ-अर्नाळा या बसवर वडाळा नाका येथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे महामंडळाने शहरातील तसेच लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यामध्ये कपात करून परिस्थितीनुसार बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
नाशिकमधील तणावाची परिस्थिती पाहता शहरातून तुरळक बसेस सुरू होत्या. नांदूरमार्गे जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर कॅम्पला जाणाऱ्या बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकरोडलाही तुरळक बसेस सुरू होत्या. सायंकाळनंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
--इन्फो--
अद्याप नुकसानीचा अंदाज नाही
शहरासह ग्रामीण भागातील काही बसेसवर तसेच लांबपल्ल्याच्या बसेसवरही दगडफेक करण्यात आल्यामुळे नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. परंतु शहरातील काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काही खासगी बसेसचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून काही बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे कडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.