व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमावर भर देणार : ई. वायुनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:27 AM2019-07-02T00:27:54+5:302019-07-02T00:28:22+5:30
बदलत्या काळाची गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
नाशिक : बदलत्या काळाची गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी काही उद्योग आस्थापनांशी समन्वय साधला जात असून, त्याचा लाभ रोजगार प्राप्तीसाठी विद्यार्थी वर्गास होईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू ई. वायुनंदन यांनी मुक्त शिक्षण पद्धतीत होत असलेल्या बदलांमुळे संशोधनास मोठा वाव असल्याचे सांगितले.
कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक विद्या शाखेचे संचालक डॉ. उमेश राजदेरकर यांनीही मुक्त शिक्षणाकडे बघण्याचा समाजाचा व यंत्रणांचा दृष्टिकोन आणखी सकारात्मक आणि व्यापक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ ध्वजारोहणानंतर वृक्षारोपणही करण्यात आले. सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. उपकुलसचिव उत्तम जाधव यांनी आभार मानले.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने नुकतीच विद्यापीठास भेट दिली असून, आठवडाभरापूर्वी नवी दिल्ली येथे सचिव पातळीवर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेतून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या बी.एस्सीसह इतर काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लवकरच केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.