बससेवेसाठी महापालिकेत ‘लगीनघाई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:31 AM2017-12-28T00:31:09+5:302017-12-28T00:39:02+5:30
नाशिक : शहर बससेवेबाबतचे स्टेअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेत विविध पर्यायांचे मार्ग दाखविल्यानंतर बससेवा ताब्यात घेण्याविषयी महापालिकेत सत्ताधारी भाजपात ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. महापौर रंजना भानसी यांनी क्रिसीलच्या सर्वेक्षण अहवालानंतर तातडीने महासभेत एकमताने निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर बदलीची चर्चा सुरू झाल्याने बससेवा मार्गी लावूनच नाशिकचा मुक्काम हलवण्याचा निर्धार आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केला आहे.
नाशिक : शहर बससेवेबाबतचे स्टेअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेत विविध पर्यायांचे मार्ग दाखविल्यानंतर बससेवा ताब्यात घेण्याविषयी महापालिकेत सत्ताधारी भाजपात ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. महापौर रंजना भानसी यांनी क्रिसीलच्या सर्वेक्षण अहवालानंतर तातडीने महासभेत एकमताने निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर बदलीची चर्चा सुरू झाल्याने बससेवा मार्गी लावूनच नाशिकचा मुक्काम हलवण्याचा निर्धार आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केला आहे. शहर बससेवा महापालिकेने चालवावी यासाठी राज्य परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांपासून लकडा लावत आहे. त्यात काही महिन्यांपासून महामंडळाने शहरातील बव्हंशी फेºयाही बंद केल्या आहेत. त्यामुळे शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेवर दबाव वाढतो आहे. महापालिकेने त्यासाठी क्रिसील या संस्थेची नेमणूक करत तीन महिन्यांत बससेवेबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशित केलेले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२६) क्रेडाईच्या शेल्टर प्रदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेतल्यास शासनाचे पाठबळ पुरविण्याची ग्वाही दिल्याने महापालिकेत सत्ताधारी भाजपात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापौर रंजना भानसी यांनी पत्रकार परिषद घेत क्रिसीलचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचा ठराव महासभेत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबतचा एकमताने ठराव करून तो शासनाकडे पाठविला जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. क्रिसील या संस्थेकडून सद्यस्थितीत शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही याबाबतचा फिजिबिलिटी रिपोर्ट महापालिकेला सादर केला जाणार आहे. सदरचा अहवाल साधारणपणे फेब्रुवारी २०१८ च्या दुसºया आठवड्यात अपेक्षित असून, त्यानंतर हालचाली अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीही शहर बससेवा महापालिकेनेचे चालवावी याबाबत अनुकूल भूमिका घेतली आहे. आपल्या बदलीची चर्चा सुरू असली तरी आपण शहर बससेवेबाबतचे कर्म पूर्ण करुनच नाशिक सोडू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविल्याने आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवणाºयांना आणखी चार-पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवसेनेची विरोधाची भूमिका कायमसत्ताधारी भाजपाकडून हालचाली गतिमान झाल्या असताना शिवसेनेने मात्र आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले, शहर बससेवा चालविणे हे काही महापालिकेचे काम नाही. शहर बससेवेसाठी शासन मदत करणार असल्याचे सांगितले गेले; परंतु नेमकी काय मदत करणार, याचा उलगडा केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत शासनाकडून त्याचवेळी महापालिकेला २०० बसेस आणि शिवाय रस्त्यांसाठी निधीही मिळणार होता तरीही त्यावेळी विरोध झाला. आता शासनाचा नेमका प्रस्ताव काय आहे, तो तपासून पाहिला पाहिजे. भविष्यात शहर बसच्या घंटागाड्या होतील, अशी भीतीही बोरस्ते यांनी बोलून दाखविली.