सटाण्यात तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश
By admin | Published: August 25, 2016 11:51 PM2016-08-25T23:51:15+5:302016-08-25T23:51:27+5:30
नोकरीचे आमिष : बेरोजगारांना लाखोंचा गंडा
सटाणा : जिल्हाधिकारी असल्याचे भासवून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा सटाणा पोलिसांनी पर्दाफाश केला. या घटनेमुळे कसमादे पट्ट्यात खळबळ उडाली आहे. सटाणा पोलिसांनी या तोतया जिल्हाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या असून, सटाणा न्यायालयाने देवानंद साळवे (रा. अभिमन्यूनगर, बर्फ कारखान्याजवळ, सटाणा. मूळ राहाणार व्यारा, जिल्हा वापी) याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, सिन्नर आणि चांदवड तहसील कार्यालयाचा कारभार स्वत:च्या ताब्यात असल्याची बतावणी करून तोतया साळवे सटाणा शहरात गत १ महिन्यापासून भाड्याच्या आलिशान बंगल्यात वास्तव्य करत होता. इनोव्हा गाडी भाड्याने घेण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या सटाणा येथील प्रशांत दिलीप कोठावदे यांच्याशी साळवे याची ओळख झाली. याच ओळखीतून कोठावदे यांच्याशी जवळीक वाढवत मी कलेक्टर आहे आणि तुमचे सहा तालुके माझ्या अधिपत्याखाली आहेत आणि कळवण तहसील कार्यालयात सिनिअर क्लार्कची भरती करायची असून, त्या जागा भरण्याचा सर्व अधिकार मला आहे. जर तुमच्याकडे कोणी इच्छुक उमेदवार असेल तर पाच लाखांत त्याचे काम होईल, असे आमिष तोतया साळवे याने कोठावदे यांना दाखविले.
वेळोवेळी स्वत:चे नाव मोबाइल क्रमांक आणि गाड्या बदलून साळवे याने महाराष्ट्रासह गुजरातमध्येही अनेक सुशिक्षित तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. साळवे यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असेल तर सटाणा पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन सटाणा पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)