रोबोटिक मशीन खरेदी; माजी आयुक्तांवर निशाणा
By admin | Published: October 15, 2016 02:10 AM2016-10-15T02:10:57+5:302016-10-15T02:19:54+5:30
मनपा महासभा : सखोल चौकशीची सदस्यांकडून मागणी; प्रस्ताव तहकूब
नाशिक : तीन वर्षांपूर्वी नदी-नाल्यांतील गाळ काढण्यासाठी स्वित्झर्लंडवरून खरेदी केलेल्या रोबोटिक एक्सकॅव्हेटर मशीनच्या देखभालीसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत चर्चेला आला आणि सदस्यांनी मशीनच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह चिकटवित तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर निशाणा साधला. सदर मशीन खरेदीची सखोल चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. महापौरांनी मात्र सदरचा प्रस्ताव सविस्तर माहितीसाठी तहकूब केला.
महापालिकेने सन २०१३ मध्ये नदी-नाले साफसफाईसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून दोन रोबोटिक मशीन खरेदी केले होते. सदर मशिनरीबाबत संबंधित एजन्सीशी केलेल्या करारनाम्यानुसार पहिल्या तीन वर्षांसाठी मोफत देखभालीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील तीन वर्षांकरिता देखभालीकरिता दोन कोटी पाच लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी ठेवला होता. या प्रस्तावावर बोलताना विक्रांत मते यांनी सांगितले, सदर मशीन खरेदी करण्यास सदस्यांचा कडाडून विरोध असतानाही तत्कालीन आयुक्तांच्या आग्रहास्तव मशिनरीची खरेदी केली गेली. जेसीबीसारख्या दिसणाऱ्या या मशीनची नदी-नाले साफसफाईसाठी अजिबात गरज नव्हती. आता त्याच्या देखभालीवर दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव ठेवणे चुकीचे आहे.
महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच नदीनाले स्वच्छतेसाठी एक कोटी पाच लाख रुपयांच्या निविदा काढल्या असताना आणखी हा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित केला. सदर मशिनरीचे प्रात्यक्षिक सदस्यांना दाखविण्याची विनंतीही मते यांनी केली. संजय चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांची याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने बदली केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तत्कालीन महापौर व आयुक्त यांनी बेकायदेशीरपणे निविदाप्रक्रिया राबविल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. सुधाकर बडगुजर यांनीही आउटसोर्सिंगचा कोणताही प्रस्ताव महासभेवर न आणण्याचे धोरण ठरले असताना सदरचा प्रस्ताव आलाच कसा, असा सवाल केला. उद्धव निमसे यांनीही मशीनच्या देखभालीचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची सूचना केली.
उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी ‘सहन होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी स्थिती मनपाची बनल्याचे सांगत रोबोटिक मशीनच्या खरेदीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तानाजी जायभावे यांनी गेल्या चार महिन्यांपासून टायरविना सदर मशीन पडून असल्याचे सांगितले, तर अजय बोरस्ते यांनीही तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर आरोप करत खरेदीप्रक्रियेत सहभागी लोकांची चौकशी लावण्याची मागणी केली. कुणाल वाघ, कन्हैया साळवे यांनी प्रभागात जेट मशीन, व्हॅक्युम मशीन आदि साधनांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही; मात्र ज्यांची गरज नाही अशा मशिनरी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केल्या जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दिनकर पाटील यांनी तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्या चौकशीचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित सदरचा प्रस्ताव नामंजूर करण्याची सूचना केली. अखेर महापौर अशोक मुर्तडक यांनी सदरचा प्रस्ताव सविस्तर माहितीसाठी तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)