स्थायीच्या निवडणुकीत सेनेकडून भाजपला बाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:04 AM2021-03-06T01:04:32+5:302021-03-06T01:06:34+5:30
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच, स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्या शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी कोर्टबाजी केली, त्याच सेनेने आता मात्र भाजपाला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हा पक्ष तटस्थ राहणार असून त्यामुळे भाजपाचा मार्ग सुकर झाला आहे.
नाशिक : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच, स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्या शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी कोर्टबाजी केली, त्याच सेनेने आता मात्र भाजपाला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हा पक्ष तटस्थ राहणार असून त्यामुळे भाजपाचा मार्ग सुकर झाला आहे.
शुक्रवारी (दि. ५) यासंदर्भात पक्षाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून त्यानंतर शिवसेनेचे मानस हाॅटेल येथे कॅम्पसाठी गेलेले सर्व नगरसेवक माघारी परतले आहेत. घोडेबाजार रोखण्यासाठी पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
शिवसेनेनेदेखील लढत देण्याचे जाहीर करून फाटाफूट टाळण्यासाठी सदस्यही इगतपुरीजवळील मानस हॉटेल येथे सहलीवर नेले होते. दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता या पक्षांना धडा शिकवणे आणि मनसेचा भाव कमी करण्यासाठी शिवसेना तटस्थ राहणार असल्याचे वृत्त आहे.
या निर्णयामुळे भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असे दिसते आहे. तथापि, या समितीच्या निवडणुकीत उलटसुलट डावपेच खेळले जात असल्याने कोणत्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी होणार निवडणूक
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी येत्या मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक हेाणार आहे. मात्र, ही निवडणूक होण्यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपाचे आठ सदस्य असून मनसेने भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांचे बळ मुळातच नऊ असे असून समिती त्यांच्या बाजूने झुकलेली आहे.