पोटनिवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:28 AM2018-03-13T01:28:36+5:302018-03-13T01:28:36+5:30
महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरणार आहे,
नाशिक : महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूकीसाठी मंगळवार (दि.१३) पासून प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू होत असून दि. १३ ते २० मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, भाजपाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनाही रिंगणात उतरणार आहे, तर मनसेने अद्याप संपर्क न साधल्याने राष्टÑवादीनेही उमेदवार देण्यासंबंधीचा अहवाल प्रदेशा-ध्यक्षांकडे रवाना केला आहे. कॉँग्रेसची भूमिका मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु, बिनविरोध निवडीची शक्यता जवळपास मावळली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार दि. १३ ते २० मार्च या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. दि. १३ ते २० मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. रविवार, दि. १८ मार्च रोजी मात्र अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. २१ मार्च रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर दि. २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. २४ मार्चला उमेदवारांना चिन्हवाटप केले जाईल. त्याचदिवशी अंतिम उमेदवारांची यादी घोषित केली जाईल. आवश्यकता भासल्यास दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असून, दि. ७ एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने बुधवार, दि. ७ मार्चपासूनच प्रभाग १३ मध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
‘पश्चिम’मध्ये अर्ज स्वीकृती
प्रभाग क्रमांक १३ हा पश्चिम विभागात असल्याने उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रही पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयातच स्वीकारले जाणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची तर सहायक म्हणून विभागीय अधिकारी नितीन नेर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून ना हरकत दाखल्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू होती.