भाजपाच्या दोन्ही आमदारांसाठी प्रभागाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:49 PM2018-03-27T15:49:08+5:302018-03-27T15:49:08+5:30
प्रभाग क्रमांक १३ : शिवसेना-मनसे उमेदवारात काट्याची टक्कर
नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरीता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
प्रभाग क्रमांक १३ (क) मधील रिक्त जागेसाठी दि. ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे, शिवसेना आणि भाजपासह काही अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच अॅड. वैशाली मनोज भोसले निवडणूक रिंगणात आहेत तर शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांनी मनसेपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मनसे आणि शिवसेना उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे. त्यात, भाजपाच्या उमेदवारी विजया हरिष लोणारी यांनीही रंगत आणली आहे. पोटनिवडणूक लढविणार आणि जिंकणारही, असे सांगणारे भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी भाजपा उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न चालविले होते. त्याबाबत वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकीत त्याचे पडसादही उमटले होते. माजी नगरसेवक हरिष लोणारी यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवल्याने पक्षनेतृत्वाचा नाईलाज झाला होता. त्यामुळे, विजया लोणारी यांचा अर्ज कायम राहिला. तर लोणारी यांच्यासाठी मध्य विधानसभेच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. आता, सदर जागेवर भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शहराध्यक्ष असलेले आमदार सानप आणि मध्यच्या आमदार फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे. जागा गमावली तर दोन्ही आमदारांना धक्का बसणार आहे तर जागा जिंकल्यास त्याचे श्रेय दोहोंना मिळणार आहे. त्यामुळे, पक्षाने लढतीत जाणीवपूर्वक लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि.२७) पक्ष कार्यालयात त्यासंबंधी बैठक होऊन प्रचाराचे नियोजन करण्यात आले. शिवसेनेमध्ये खांदेपालट झाल्यानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही महानगरप्रमुखांसाठीही सदर लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
प्रचारात रंगत
पोटनिवडणुकीसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. आठ दिवसांनी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने उमेदवारांकडून प्रभागाची पायपीट सुरू झाली आहे. प्रामुख्याने, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले जात आहे. प्रचार पत्रकेही वाटप होत आहेत. पोटनिवडणुकीत मनसे उमेदवाराला कॉँग्रेस,राष्टवादी कॉँग्रेसने पाठिंबा दर्शविला असल्याने प्रभागातील अन्य तिनही नगरसेवक मनसेच्या वैशाली भोसले यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. येत्या शनिवारी-रविवारी काही चौकसभांचेही नियोजन सुरू आहे.