नाशिक महापालिकेच्या प्रभाग १३ मध्ये एप्रिलमध्ये पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:32 PM2018-02-07T14:32:35+5:302018-02-07T14:33:59+5:30
आयोगाकडून घोषणा : ८ मार्चला मतदार यादी प्रसिद्धीस
नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. आयोगाने त्याअनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचाही कार्यक्रम जाहीर केला असून ८ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, आयोगाने एप्रिलमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केल्याने इच्छुकांनी तयारी आरंभली आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग १३ मधील सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुरेखा भोसले यांनी मनसेकडून उमेदवारी केली होती. भोसले यांनी भाजपाच्या कीर्ती प्रतीक शुक्ल यांचा पराभव केला होता. दरम्यान, १९ डिसेंबर २०१७ रोजी सुरेखा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे सदरची जागा रिक्त झालेली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने रिक्त जागेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. नियमाप्रमाणे, सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे अपेक्षित असते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय, भारत निवडणूक आयोगाकडून दि. १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही आयोगाने घोषित केलेला आहे. दि. १७ फेबु्रवारी रोजी प्रभागाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर दि. १७ ते २६ फेबु्रवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. दि. २७ फेब्रुवारीला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीतील दुबार नावांबाबत त्यांच्यापुढे विशिष्ट चिन्हे करून अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे काटेकोरपणे तपासण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हरकती व सूचनांनंतर मतदार यादीत लेखनिकांच्या चुका, दुसºया प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास आणि संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही मनपाच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे आदी सुधारणा व दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. मतदान केंद्र स्थापन करण्याबाबतही आयोगाने काही सूचना केलेल्या आहेत.
इच्छुकांच्या हालचाली
प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसेसह कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून प्रयत्न सुरु असले तरी शिवसेना व भाजपाकडून मात्र उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच सदस्याला उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, कॉँग्रेस-राष्टवादीतही काही इच्छुकांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता कमीच मानली जात आहे. भाजपाकडून पुन्हा एकदा कीर्ती शुक्ल रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.