‘सी पॅप’ने वाढवली सिव्हिलच्या नवजात बालकांची जीवनरेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:58 PM2019-11-13T23:58:17+5:302019-11-14T00:04:30+5:30
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात २०१७ साली बसविण्यात आलेल्या सी पॅप मशीनने जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या मृत्युदरात तब्बल ३ टक्के घट करण्यात यश मिळवले आहे. जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूदर गत दोन वर्षांत ११ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आला आहे.
नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात २०१७ साली बसविण्यात आलेल्या सी पॅप मशीनने जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या मृत्युदरात तब्बल ३ टक्के घट करण्यात यश मिळवले आहे. जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूदर गत दोन वर्षांत ११ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आला आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रु ग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याची २०१७ सालची घटना घडल्यानंतर नाशकातील जिल्हा रु ग्णालयात मे महिन्यात ५५ तर वर्षभरात ३४७ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी आयसीयू आणि व्हेंटिलेटर तसेच सी पॅप (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा) नसल्यानेच मुलांचा मृत्यू झाल्याची कबुली नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेने दिली होती. २०१७ साली बालमृत्यूचा हा दर तब्बल २० टक्क्यांहून अधिक वाढला होता. त्यावर प्रसारमाध्यमांकडून टीकेची झोड उठल्यानंतर सी पॅप यंत्रणा बसविण्यात आली होती. या यंत्रणेसह न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये घेतल्या जाणाऱ्या अतिदक्षतेमुळे गत दोन वर्षांत बालमृत्यूच्या दरात सरासरी ११ टक्क्यांवरून ३ टक्क्यांची घट होऊन ते प्रमाण ८ टक्क्यांवर आले आहे. सिव्हिलमध्ये ग्रामीण भागासह आदिवासी पाड्यांवरून प्रसूतीसाठी येणाºया महिलांचे प्रमाण अधिक असते. अनेकदा त्या महिला स्वत:च अत्यंत कुपोषित असतात. त्यामुळे त्यांची बालकेदेखील कुपोषित रहात असल्याने जिल्हा रुग्णालयांमधील बालमृत्यूदर हा सामान्य बालमृत्यूंपेक्षा नेहमीच अधिक असतो. मात्र, प्रभावी यंत्रणा आणि सजग वैद्यकीय प्रयत्नातून तो कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
नवजात बालकांसाठी नवीन कक्ष तयार करण्यासाठी शासनाकडून २२ कोटींची मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार नवीन इमारतीचे काम सुरू असून, आतापर्यंत एका मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित काम रखडले असून, ते पूर्ण होण्यावर नवीन कक्ष सुरू होणे अवलंबून राहणार आहे.
दानशूराच्या निधीतून सी पॅप
२०१७ सालच्या एकट्या मे महिन्यात तब्बल ५५ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावर प्रचंड गदारोळ झाल्यानंतर विदेशातील भारतीय डॉक्टर नितीन चोथाई यांनी दिलेल्या निधीतून ही दोन सी पॅप यंत्रणा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे एकप्रकारे या दानशूराच्या निधीमुळेच अनेक बालकांना जीवदान मिळाले आहे.
नीओनेटल व्हेंटिलेटर पुढील महिन्यात
नवजात बालकांच्या कक्षासाठी वापरला जाणारा ‘नीओनेटल व्हेंटिलेटर’ डिसेंबर महिन्यात नाशिक सिव्हिलला प्राप्त होणार आहे. सी पॅप हे मशीन ज्या बालकांना श्वास घेता येतो, त्यांच्यासाठी उपयुक्त असते. तर व्हेंटिलेटर हे मशीन ज्या बालकांना श्वासदेखील घेणे अशक्य असते, त्यांच्यासाठी केला जात असल्याने ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.
स्वच्छता, निर्जंतुकी-करण आणि सी पॅप यंत्रणेच्या माध्यमातून बालकांच्या मृत्युदरात घट आणण्यात यश मिळाले आहे. येत्या महिन्यात नीओनेटल व्हेंटिलेटरदेखील येणार असल्याने बालमृत्यू दर अजून कमी करणे शक्य होईल.
- डॉ. पंकज गाजरे,
बालरोग विभागप्रमुख, सिव्हिल