चास येथे नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 11:52 PM2017-07-27T23:52:57+5:302017-07-27T23:54:32+5:30
चास येथे नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील चास खोऱ्यातील चास येथील म्हाळुंगी नदीवर असलेल्या व भोजापूर धरणाखाली असलेला वसंत बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.
म्हाळुंगी नदीवर असलेला सदर बंधारा भरल्यानंतर चास शिवारातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. या बंधाऱ्यातील पाण्यावर शेकडो एकर शेती सिंचनाखाली येते. बंधाऱ्यातील पाण्यामुळे विहिरींची जलपातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा प्रश्न मार्गी लागतो.
सदर बंधारा तुडुंब भरल्यानंतर पुढे नळवाडीपर्यंत पाणी पोहचले आहे. नदी प्रवाहित राहिल्यास तीन दिवसात पाणी संगमनेरपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. भोजापूरचे पूरपाणी कालव्यांना सोडून परिसरातील पाझर तलाव, बंधारे भरुन देण्याची मागणी नांदूरशिंगोटे, दोडी, कणकोरी, मानोरी, मऱ्हळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी कचरू खैरनार, भानुदास भाबड, दिलीप खैरनार, रामदास भाबड, शांताराम खैरनार, परशराम भाबड, मच्छिंद्र खैरनार, नवनाथ खैरनार, अर्जुन मेंगाळ, दीपक भाबड, बाळासाहेब भाबड, नजीम सय्यद, सुरेश भाबड, मुन्ना सय्यद, ज्ञानेश्वर भाबड, बाबूराव आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.