मुख्यमंत्र्यांकडून पंचांग पाहूनच मंत्रिमंडळाचा विस्तार : गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:43 AM2018-09-22T01:43:45+5:302018-09-22T01:44:19+5:30
‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’ अशी टिपणी करत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या दरवेळी होणाऱ्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आणि विस्ताराची चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक : ‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’ अशी टिपणी करत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या दरवेळी होणाऱ्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आणि विस्ताराची चर्चाच असल्याचे स्पष्ट केले. नाशिक जिल्हा दौºयावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधनाचे दर दिवसागणिक वाढत चालले असून, जनतेच्या मनात सरकार विषयी तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे, परंतु सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही, उलट पेट्रोल शंभरी पार करेल अशी सरकारलाच आशा वाटत असल्याने जनतेने येत्या निवडणुकीत मतदान या शस्त्राचा वापर करून जागा दाखवून द्यावी अशा शब्दात पाटील यांनी भाजपा सरकारवर टीका केली. अन्य राज्ये इंधनावरील भार कमी करीत असताना राज्य सरकारनेही हा भार कमी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. इंधन दरवाढीबाबत शिवसेना विरोधीपक्षात होती तेव्हाही आंदोलन करीत होती व आत्ताही करीत आहे, परंतु त्यावेळी विरोधात असल्याने आंदोलन करणाºया भाजपाने सत्तेवर येताच, इंधन दरवाढीचे आंदोलन विसरली आहे, असा टोला त्यांनी लगावला. पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहत असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत तर पंपावर लावलेले पोस्टर्सही बदलले आहेत. पूर्वी पोस्टर्सवर एक म्हातारीचे चित्र होते, त्याची जागा आता तरुण मॉडेलने घेतली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोलचे भाव आणखी वाढतील त्याचे हे संकेत असल्याचे भाकित पाटील यांनी केले.