पळसे परिसरात ऊसशेतीत आढळला बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:59 PM2020-01-30T22:59:37+5:302020-01-31T00:50:50+5:30
पळसे येथील शेतकरी जयंत रमेश साठे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना अवघ्या पंधरा दिवसांच्या बिबट्याचा एक बछडा गुरुवारी (दि. २९) आढळून आला.
नाशिकरोड : पळसे येथील शेतकरी जयंत रमेश साठे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना अवघ्या पंधरा दिवसांच्या बिबट्याचा एक बछडा गुरुवारी (दि. २९) आढळून आला. दरम्यान, बछड्याच्या मादीनेही यावेळी ऊसतोड कामगारांना दर्शन दिल्याने त्यांची पाचावर धारण बसली. कामगारांची वर्दळीची कुणकुण लागताच मादीने शेतातून काढता पाय घेतला. मादीच्या डरकाळीमुळे संभाव्य धोका ओळखून घटनास्थळी हजर असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वरित ऊसतोड तत्काळ थांबविली.
मौजे पळसे येथील साठे यांच्या उसाच्या शेतात (गट क्र. ८६५) गुरुवारी सकाळच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना त्याठिकाणी बिबट्याचा बछडा आढळून आला. यावेळी शेतकरी व मजुरांनी त्यास सुरक्षितरीत्या ताब्यात घेत घटनेची माहिती पोलीसपाटील सुनील गायधनी यांना कळविली. गायधनी यांनी तातडीने याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनपाल मधुकर गोसावी व वनरक्षक गोविंद पांढरे, राजेंद्र ठाकरे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले.
यावेळी पुन्हा ऊसतोड मजुरांनी उर्वरित तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने मजुरांना दर्शन देत डरकाळी फोडल्याने मजुरांंना घाम फुटला.
मादी केवळ एकच बछडा सोबत घेऊन जाऊ शकली. एक बछडा मागे सुटल्याने ती आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. त्यामुळे मौजे पळसे शिवारातील साठे यांच्या शेतातील ऊसतोड सुरक्षेच्या कारणास्तव तूर्तास थांबविण्याची सूचना त्यांना केली आहे. मादी-बछड्यांसह असल्याने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पिंजरा लावता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.