पिंपरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:29 PM2019-07-23T12:29:49+5:302019-07-23T12:30:14+5:30
कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात आहेर वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच महिन्याचे वासरू ठार झाले.
कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात आहेर वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच महिन्याचे वासरू ठार झाले. पिंपरी शिवारात मध्यरेल्वे च्या गेट न . ९८ जवळ विजय गंगाधर अहेर यांच्या वस्तीवर बिबट्याने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाच महिन्याचे वासरू फस्त केले. अहेर यांच्या वस्तीजवळील विलास निखाडे यांच्या द्राक्ष बागेजवळ वासरू मृतावस्थेत आढळून आले. परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचे पंजे आढळले असून या भागात बिबट्याचा संचार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्यात घबराट निर्माण झाली आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा , या परिसरात बिबट्याचा माग घेऊन पिंजरा लावण्यात यावा , अशी मागणी अमोल मोतीराम अहेर , सचिन बाजीराव अहेर, विलास काशिनाथ निखाडे, पद्माकर गोविंद गायकवाड यांनी केली आहे. गत आठवड्यात मौजे सुकेणे सुकेणे शिवारातील नाशिक- औरंगाबाद राज्यमार्गावरील बाणगंगा पूलाजवळ राजू मधुकर मोगल यांच्या वस्तीवर त्यांचा मुलगा सौरभ राजेंद्र मोगल हा शेतकाम करीत असतांना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला होता. त्यांनतर ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
---------------------------------
पिंपरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. पाळीव प्राणी व शेतक-यांवर हल्ला होत असून वनविभागाने त्वरित दखल घेऊन या भागात पिंजरा लावावा.
-विजय अहेर , शेतकरी , पिंप्री