कंधाणेत थंडीतापाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:12 PM2018-10-01T22:12:27+5:302018-10-01T22:14:36+5:30
कंधाणे : परिसरात थंडीतापाचे रुग्ण वाढले असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कंधाणे : परिसरात थंडीतापाचे रुग्ण वाढले असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सांडपाणी वाहून नेण्यासाठी सोयीसुविधा नाहीत. यामुळे गावात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे थंडीताप, खोकला या आजाराच्या रुग्णसंख्येत रोज वाढ होताना दिसत आहे. परिसरातील गावांमध्ये डेंग्यू व स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आरोग्य विभागाकडून गावात खबरदारीची कोणती उपाययोजना राबविली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डासांच्या निर्मूलनासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुंदोपसुदीमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ
शासनाकडून गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे, तर कंधाणेत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. काही ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहेत. अंतर्गत गावातील गटारींची स्वच्छता होणे गरजेचे आहे. नागरिकांनी डासांच्या प्रतिबंधासाठी गावात धूर फवारणी करण्याची मागणी केली असताना संबंधित विभागातील कर्मचारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
रूग्णसंख्या वाढत असून, खासगी दवाखाने व सरकारी दवाखान्यांत उपचारासाठी येणाºया नागरिकांच्या संख्येत वाढ आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात लवकरात लवकर धूर फवारणी करावी.
- गंगाधर चव्हाण, कंधाणे.