कांदा हमीभावासाठी लोकप्रतिनिधींना फोन करो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:42 PM2020-07-28T17:42:29+5:302020-07-28T17:43:23+5:30
येवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, माजी आमदार यांना फोन करून कांद्याला वीस रु पये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. कांद्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करते. ग्राहक हित बघितले जाते परंतु कांद्याचे भाव पडल्यावर, कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो त्या वेळेस कांद्याचे भाव वाढीसाठी कुठलीही राज्याची किंवा केंद्राची सरकारी यंत्रणा काम करत नाही. मार्केटमध्ये कांद्याला पाच ते सहा रु पये किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. ही व्यथा मांडण्यासाठी सदर आंदोलन केल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितले.
येवला तालुक्याचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार यांनी सकाळी केलेल्या फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, याउलट खासदार हेमंत गोडसे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व निश्चितच आपली मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यापर्यंत पोहोचू अशी ग्वाही दिल्याचे भोरकडे यांनी सांगितले.
सदर आंदोलनात पिंपळगाव जलाल येथील बाळासाहेब बनकर, किशोर खोकले, नारायण मोरे, रवी मोरे, गोकुळ भोरकडे आदींनी सहभाग नोंदविला.