मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त
By दिनेश पाठक | Published: January 25, 2024 07:58 PM2024-01-25T19:58:39+5:302024-01-25T19:59:10+5:30
ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही.
नाशिक: ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. औद्योगिक वसाहत भागातील चुंचाळे पोलिसांनी एक्सलो पॉइंटजवळ मुंब्रा (ठाणे) येथून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तस्कारास बेड्या ठोकल्या. त्याचेकडून तब्बल २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले असून ३ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील पंधरवड्यातच पाथर्डी फाट्यावर ड्रग्ज विक्रीस आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. त्या अगोदर शिंदे पळसे येथील ड्रग्ज बनविणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता. या प्रकरणी ललित पाटील, त्याचा भाऊ भुषण पाटील याचेसह ११ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले होते. तेव्हापासून नाशिकचे नाव ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले आहे चुंचाळे शिवारातील या ताज्या घटनेने ड्रग्जसाठीचे कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. औद्योगिक वसाहत पाेलिस ठाण्याचे पोलिस शिपाई कुऱ्हाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तो एकास आपल्या खिशातील ड्रग्जचे पाकीट देताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे २७.५ ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित एमडी ड्रग्ज व रोख रक्कम असा तीन लाख ३४ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. तपास अमली प्रदार्थ विरोधी पथकाकडे देण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहत, पाथर्डीत टोळी
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहत तसेच पाथर्डी फाटा परिसरात ड्रग्ज विकणारी टोळी सक्रीय झाल्याची माहिती पथकाला होती. त्यानुसार दहा ते बारा दिवसातच या भागात दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. कामगारांना देखील ड्रग्जच्या आहारी नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. अटकेतील आरोपीचे शहरातील दोन ते तीन भागात ड्रग्ज विक्री करणारे साथीदार सक्रीय असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.