हत्त्याकांडाच्या निषेधार्थ कॅम्प बंद
By admin | Published: October 30, 2014 12:09 AM2014-10-30T00:09:02+5:302014-10-30T00:19:38+5:30
हत्त्याकांडाच्या निषेधार्थ कॅम्प बंद
देवळाली कॅम्प : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथे झालेल्या जाधव कुटुंबीयांच्या हत्त्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करून कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी देवळाली कॅम्पला कडकडीत बंद पाळण्यात आला.
जाधव कुटुंबीयांची हत्त्या होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊनही अद्यापपर्यंत आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने देवळाली कॅम्प बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली दुकाने, व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. जुने बसस्थानक येथून रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निषेधार्थ घोषणा देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. पाटील यांना निवेदन दिले. मोर्चामध्ये माजी नगरसेवक दिनकर आढाव, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे, सिद्धार्थ पगारे, सुरेश कुसाळकर, राहुल काळे, अशोक किसावर, गणेश थामेत, भाजपाचे शशिकांत घुगे, मनसेचे शाखाप्रमुख भास्कर चौधरी, अशोक साळवे, सुरेश निकम, गौतम भालेराव, महेंद्र सोनवणे, राजेश भालेराव, अनिल ढेंगळे, गणेश शेजवळ आदि सहभागी झाले होते. सायंकाळनंतर बाजारपेठ पुन्हा गजबजून गेली होती. (वार्ताहर)