बिले न देताच जोडण्या तोडण्याची मोहीम
By Admin | Published: June 15, 2016 09:58 PM2016-06-15T21:58:02+5:302016-06-15T23:35:08+5:30
घोटी : वीज वितरणचा अजब कारभार
इगतपुरी : तालुक्यातील वीज ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून अनोख्या समस्येला सामोरे जावे लागत असून, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीजग्राहकांना वेळीच वीजबिले मिळत नसताना बिल भरले नाही, असा ठपका ठेवत वीजजोडणी तोडण्यात येत असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांची वीजबिले वेळेवर देण्यासाठी
नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
वीज कंपनी ग्राहकांना विजेची बिले वाटप करण्याचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला देत असते.
मात्र यात सातत्याने बदल होत असल्याने नवीन कंत्राटदाराला वीजग्राहकांची घरे शोधता शोधता दोन तीन महिन्यांचा कालावधी
लागत असल्याने महिनोंमहिने ग्राहकांना बिले मिळत नसल्याने बिले भरावी कशी, असा प्रश्न ग्राहकांना पडतो.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना अधिकाऱ्याकडून समाधानाची उत्तरे न मिळता, त्यांच्या हातात अवाजवी बिले दिली जात आहेत. ही बिले न भरल्यास
तत्काळ त्या ग्राहकांची कनेक्शन तोडण्यात येत आहे. यात ग्राहकांची काही एक चूक नसताना ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तालुक्यातील वीजग्राहक व्यथित झाला आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीजबिलाच्या वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी व ग्राहकांना
वेळेवर वीजबिले देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील वीजग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)