मालेगाव तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:32 AM2021-01-13T04:32:58+5:302021-01-13T04:32:58+5:30

मालेगाव (शफीक शेख) : तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असून, निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली ...

Campaign in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी

मालेगाव तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी

Next

मालेगाव (शफीक शेख) : तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असून, निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी रंगत आहे. सर्वच पॅनलचे नेते व्यूहरचना आखण्यात व्यस्त झाले आहेत. कधी काळी एकमेकांसोबत दिसणारे मित्र आता दोन वेगवेगळ्या गटांत एकमेकांविरोधात प्रचार करताना समोरासमोर उभे ठाकल्याने ग्रामस्थांची चांगलीच करमणूक होत आहे. बालगोपाळांसह महिला वर्गही रात्री उशिरापर्यंत प्रचारात घरोघर भटकंती करताना दिसत आहेत. बाहेरगावी नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेल्या नातलगांना आणण्यासाठी दोन्ही- तिन्ही गटांतर्फे वाहने रवाना करण्यात आली आहेत. बाहेरगावी राहून आपापल्या गावात राजकारण करणारी मंडळी सुमारे महिनाभरापासून गावात ठाण मांडून बसली असून, सूत्रे हातात घेऊन राजकारण करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात गावगाडा म्हटला की, सर्वांचे एकमेकांशी व्यक्तिगत संबंध असतात. शहरात असणारेे पक्ष आणि बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ आपल्या गावात विविध पक्ष आणत असले, तरी ग्रामस्थ मात्र सवच पक्ष गट आणि तट विसरून एकत्र आले आहेत. गावात वर्षानुवर्षे असणारी आपली सत्ता आणि गावातील आपले साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत. त्यात एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या गटात गेल्याने एकाच घरात राजकारण शिजू लागले आहे. त्यामुळे गावातील वाड्या-वाड्यांत रण रंगले आहे.

-----------------------

ग्रामपंचायत निवडणुकीतही आर्थिक गणिते बदलू लागली असून, उमेदवारांसह पॅनल प्रमुखांना मोठ्या प्रमाणावर पैसा सोडावा लागत आहेत. तालुक्यातील टाकळी येथे पॅनल बनविताना आपल्या सोबत असणारी माणसे दुसऱ्याच पॅनलचा प्रचार करीत असल्याचे आढळून आल्याने, पॅनलप्रमुखानेच निवडणुकीतून माघार घेतल्याने पॅनलच मोडीत निघाले आहे. महिलांमुळे प्रचारात आणखी रंगत वाढली असून, घरोेघर महिलांचे थवेच्या थवे प्रचार करताना आढळून येत आहेत. बऱ्याच गावात एकाच पक्षाचे दोन ते तीन पॅनल झाले असून, पक्ष प्रमुखांना कुणाचा प्रचार करावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवर विविध पक्षांचे नेते स्थानिक राजकारणापासून दूर राहत असल्याचे दिसून आले.

-------------

गावात नेहमीच कुणाची कधी न कधी मदत लागते. अशा वारंवार मदत करणाऱ्या उमेदवाराविरोधात जावे तरी कसे, असा प्रश्न मतदारांना पडला असून, येणाऱ्या सर्वच पॅनलच्या नेत्यांना तुम्हालाच आमचे मत असे सांगून मतदार त्यांची बोळवण करीत आहेत. चावड्यांवर रात्री उशिरा रंगणाऱ्या बैठका आता मात्र वेगवेगळ्या गटातटात विभागल्याचे दिसून येते. काही शेतात वाड्यांवर उमेदवारांकडून पार्ट्याही झडत आहेत.

Web Title: Campaign in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.